२१ मे या दिवशी रामनाथी आश्रमातील संत पू. (श्रीमती) शालिनी माईणकर यांच्या देहत्यागानंतरचा अकरावा दिवस आहे. त्यानिमित्ताने…
‘२३.४.२०१९ या दिवशी मूळच्या वास्को, गोवा येथील श्रीमती शालिनी माईणकरआजी यांनी संतपद प्राप्त केले. मे २०१९ मध्ये, म्हणजे वयाच्या ९० व्या वर्षी त्या रामनाथी आश्रमात रहायला आल्या. खरेतर पूर्वीचे सगळे बंध आणि नाती सोडून वृद्धापकाळात आश्रमजीवन स्वीकारणे कठीण असते; पण मूळची सात्त्विक आणि आज्ञापालन करण्याची वृत्ती अन् प्रेमभाव यांमुळे त्या आश्रमात लवकर रुळल्या. एका छोट्या कुटुंबातून येऊन रामनाथी आश्रमातील मोठ्या कुटुंबात त्या लगेच समरस झाल्या. शांत, आनंदी स्वभाव आणि प्रेमभाव यांमुळे त्यांनी आश्रमातील साधकांना प्रेम अन् आनंद दिला. साधकांची साधना व्हावी, यासाठी त्या साधकांना नामजपाचे आणि अनुसंधानात रहाण्याचे महत्त्व सांगून साधनेला प्रोत्साहन द्यायच्या.
‘नामजप’ हा जणू पू. आजींचा श्वासच होता. त्या अखंड नामजपात आणि अनुसंधानात असायच्या. त्यामुळे त्यांच्या आनंदावस्थेत वाढ झाली होती. त्या स्वतःसाठी नामजप न करता समष्टीसाठी नामजप करायच्या. त्यांच्याकडून होणारी ही मोठी समष्टी साधना होती.
संतत्व प्राप्त होण्यापूर्वीपासूनच त्यांच्या देहात चैतन्याच्या स्तरावर पालट होऊ लागले होते. रामनाथी आश्रमात आल्यानंतर ‘डोळे पाणीदार होणे, त्वचा मऊ आणि गुलाबी होणे, तसेच डोक्यावरील पांढरे केस काळे होऊ लागणे’, असे त्यांच्या देहात अनेक लक्षणीय पालट झाले होते. त्यांची आता निर्गुणाकडे वाटचाल चालू झाली होती.
आजींच्या सहवासात असणार्या साधिकांना आजींच्या चैतन्यामुळे स्वतःला अध्यात्मिक लाभ होत असल्याचे जाणवायचे आणि त्यांच्या खोलीतही चैतन्य जाणवायचे.
११ मे च्या रात्री १.३८ वाजता पू. माईणकरआजी यांनी देहत्याग केला. बरोबर २ वर्षे त्यांनी आश्रमात वास्तव्य केले आणि अध्यात्मातील पुढील प्रगती करून घेतली. ‘उतारवयातही साधना करून मनुष्यजन्माचे सार्थक करून घेता येते’, हे पू. आजींच्या उदाहरणातून लक्षात येते. देहत्यागानंतर आता स्थूल शरिराचे बंधन नसल्याने त्यांची पुढील प्रगतीही अशीच जलद गतीने होईल !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले