सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – सद्य:स्थितीत जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून या रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्दी, ताप, खोकला यांवर खासगी डॉक्टरकडे औषधोपचार करणार्यांची आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करणे आवश्यक असल्याचा आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांना दिला आहे.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आदेशात पुढे म्हटले आहे की, बर्याच वेळा रुग्ण सर्दी, ताप, खोकला यांवर प्रारंभी खासगी डॉक्टरकडून औषधोपचार घेतात. अशा रुग्णांवर औषधोपचार करतांना खासगी डॉक्टर आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करत नाहीत. त्यामुळे या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूंचा संसर्ग बळावतो. सरतशेवटी हे रुग्ण त्यांच्या शरिरातील ऑक्सिजनची पातळी ४० ते ६० एवढी खाली आल्यानंतर कोविड केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय येथे भरती होतात. अशा रुग्णांवर वेळेत औषधोपचार न झाल्यामुळे त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व खासगी डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणार्या रुग्णांना सर्दी, ताप, खोकला, शीतज्वर (influenza like illness) किंवा तीव्र श्वसन विकार (severe acute respiratory infections) असल्यास अशा रुग्णांची आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करून घेणे बंधनकारक आहे, तसेच या रुग्णांची सूची आणि चाचणीचा अहवाल संबंधित तालुका आरोग्य अधिकार्यांकडे प्रतिदिन पाठवावा.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू
१. २४ घंट्यांतील नवीन रुग्ण २२२
२. उपचार चालू असलेले रुग्ण ४ सहस्र ९१३
३. बरे झालेले एकूण रुग्ण १५ सहस्र २३८
४. आतापर्यंतचे एकूण रुग्ण २० सहस्र ६७९
५. मृत्यू झालेले एकूण रुग्ण ५२२
आरोग्य व्यवस्थेसाठी २१ कोटी व्यय केले, तर नाहक जीव कसे जातात ? – आमदार नीतेश राणे
कणकवली – कोरोनाच्या काळात जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेसाठी २१ कोटी रुपये व्यय केल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून केला जात आहे; मात्र हा निधी नेमका गेला कुठे ? एवढा व्यय केला, तर नाहक जीव कसे जात आहेत, हे कळत नाही. जिल्हा प्रशासनाच्या दाव्यातील फोलपणा लवकरच उघड करू, अशी चेतावणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.