विश्‍वव्यापी गंगा

१८ मे २०२१ या दिवशी गंगोत्पत्ती आणि गंगापूजन आहे. त्यानिमित्ताने…

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

१. विष्णुपदी गंगा

‘गंगा ‘विष्णुपदी’ आहे. गंगा विष्णुपदाला स्पर्शून भूलोकी आली. सूरधुनी, सूरनदी, देवलोकीची गंगा !

२. जान्हवी

गंगा ‘जान्हवी’ आहे. जन्हु ऋषि यज्ञ करतात. भगिरथाच्या मागोमाग येणार्‍या गंगाप्रवाहात तो ‘यज्ञ’ सापडतो, तेव्हा जन्हु ऋषि तो ‘प्रवाह’च पिऊन टाकतात आणि कानातून सोडतात. त्यामुळे गंगा जन्हूची कन्या होते; म्हणून ती ‘जान्हवी.’

३. भागिरथी

गंगा ‘भागिरथी’ आहे. राजा भगिरथाने गंगा भूलोकी आणली.

४. दशहरा गंगा

गंगा ‘दशहरा’ आहे. ती १० पापांचे हरण करते. सगळ्या पापांचा समावेश १० पापांत होतो.

४ अ. आध्यात्मिक वैशिष्ट्ये

४ अ१. पापविनाशिनी : ‘गंगा ‘दशहरा’ आहे. ती शारीरिक, वाचिक आणि मानसिक पापांचा समावेश असलेल्या १० पापांचे हरण करते.

५. लोककल्याणाकरता निर्गुण, निराकार गंगा सगुण साकार होणे

गंगा विश्‍वाला व्यापून आहे. गंगाजलाचे बाष्पीभवन होते. पावसातून गंगाजलच बरसते. विहिरी, नद्या, सरोवरे, जलाशये, सागर यांत गंगाजल असतेच असते. सागराचे पाणी असेल, तर ३ दिवसांत कुजते. पावसाचे गंगाजल जर असेल, तर वर्षानुवर्षे ठेवा कधी कुजत नाही. अंतरिक्ष जल ते गंगाजलच आहे, असे आयुर्वेद सांगते. गंगा हाच परमात्मा, ब्रह्म ! लोककल्याणाकरता निर्गुण, निराकार गंगा सगुण साकार होते.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, मे २०११)

(‘गंगा पापविनाशिनी आहे, म्हणून हवी तितकी पापे करून ती एका गंगास्नानाने फेडून टाकली’, असे होत नाही, तर पाप केल्याविषयी मनात तीव्र खंत वाटणे, तसेच ‘तसे पाप पुन्हा आपल्याकडून होणार नाही’, याची दक्षता घेण्याचे गांभीर्य निर्माण होणे आवश्यक आहे. – संकलक)