अष्टपैलू व्यक्तीमत्त्वाचा ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. जयेश ओंकार कापशीकर (वय १३ वर्षे) !

कु. जयेश कापशीकर

१. बालपणी जयेशला रामनाथी आश्रमातील चैतन्य सहन होत नसल्याने पुष्कळ त्रास होणे आणि नंतर नामजपादी उपाय करून त्याचा त्रास न्यून होणे

‘वर्ष २००८ मध्ये आम्ही जयेश आणि त्याच्या आई-बाबांसह रामनाथी आश्रमात ८ ते १५ दिवस सेवेसाठी गेलो होतोे. तेव्हा जयेश १ – २ वर्षांचा होता. त्या वेळी त्याला पुष्कळ त्रास होत होता. त्याला आश्रमातील चैतन्य सहन होत नव्हते. तो त्याच्या आईला सेवा करू देत नसे. तो त्याच्या आईला पुष्कळ त्रास द्यायचा. मी त्याला श्री शांतादुर्गादेवीच्या देवळात घेऊन जात होते. नंतर हळूहळू नामजपादी  उपाय करून त्याचा त्रास न्यून झाला.

२. अष्टपैलू व्यक्तीमत्त्व

२ अ. सभाधीटपणा – अवघ्या ४ वर्षांच्या जयेशने शाळेतील स्नेहसंमेलनामध्ये हिंदु संस्कृतीनुसार आचरण करून तिचा आदर करण्यास सांगितल्यावर सर्व लोकांनी त्याचे कौतुक करणे : तो ४ वर्षांचा असतांना त्याने गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात बालसाधकांचे बालनाट्य पाहिले. ते पाहून त्याने त्याच्या शाळेतील स्नेहसंमेलनामध्ये तेथे जमलेल्या पुष्कळ लोकांसमोर म्हटले, ‘‘माझ्या माता, भगिनींनो, कुंकू लावा. वाढदिवस दिनांकानुसार न करता तिथीनुसार साजरा करा. वाढदिवस मेणबत्ती न फुंकता औक्षण करून साजरा करा. ‘मम्मी-पप्पा’ असे न म्हणता ‘आई-बाबा’ असेच म्हणा. आपली मुले इंग्रजी शाळेत न घालता मराठी शाळेतच घाला. आपल्या हिंदु संस्कृतीचा आदर करा.’’ तेव्हा तेथील सर्व लोकांनी टाळ्यांचा कडकडाट करून जयेशचे कौतुक केले. ‘‘एवढ्या लहान मुलाकडून आम्हाला पुष्कळ शिकायला मिळाले. आम्ही आजपासून तसे संस्कार आमच्या मुलांवर करू’’, असे प्रेक्षक सांगत होते.

२ आ. बुद्धीमान, एकपाठी आणि चांगली वक्तृत्वशैली असल्याने शिक्षकांचा लाडका असणे : जयेश लहानपणापासूनच हुशार आणि बुद्धीमान आहे. शाळेत राष्ट्रपुरुषांची जयंती किंवा कुठल्याही स्पर्धा असल्यास जयेशची निवड व्हायची. तो पहिली इयत्तेत शिकत असतांनाच पुण्यातील ‘मॉडर्न शाळे’त स्पर्धा होती. तेव्हा त्याने सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर भाषण केले होते. तो एकपाठी होता. त्यामुळे तो बाईंचा पुष्कळ लाडका होता.

२ इ. आजोबांच्या आजारपणात घरात एकटे रहावे लागले, तरी न घाबरता शांत राहून राष्ट्रपुरुषांच्या गोष्टी वाचण्यात मग्न रहाणे : त्याची आई सेवेला गेल्यावर तो दिवसभर आमच्या घरी असायचा. त्याच्या मामाने त्याला क्रांतीकारकांचा इतिहास सांगणारी पुस्तके आणून दिली होती. जयेश ती पुस्तके त्याचे बाबा कामावरून येईपर्यंत वाचायचा आणि बाबांसमवेत संध्याकाळी घरी जायचा. त्याच्यावर लहानपणापासूनच राष्ट्रभक्तीचे संस्कार झाले आहेत. आई सेवेला गेली, तरी तो बाबांना त्रास न देता शांत रहायचा. एकदा जयेशच्या आईच्या (सौ. भक्ती यांच्या) वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला. तेव्हा पुण्यातील नवले रुग्णालयात त्यांना ठेवले असतांना तिच्या साहाय्याला कुणी नव्हते. त्या वेळी ती तिच्या ३ खोल्यांच्या घरामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र आणि जयेशला एकट्याला घरी ठेवून नातेवाइकांना जेवणाचा डबा द्यायला यायची आणि ती परत घरी जायची. तोपर्यंत जयेश न रडता शांत रहायचा.

२ ई. त्याला लहानपणापासूनच क्रांतीकारकांची पुस्तके, दूरचित्रवाहिन्यांवरील ‘झाशीची राणी, रामायण, महाभारत’ या मालिका आवडायच्या.

२ उ. तबलावादनात प्राविण्य मिळवणे : त्याचे तबल्याचे शिक्षक त्याच्याकडून तबल्याचा सराव चांगला करून घ्यायचे. जयेशने तबल्याच्या तीन परीक्षा दिल्या. त्यातही तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला.

२ ऊ. शाळेत असतांना आर्य चाणक्य आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिका हुबेहूब करणे अन् बुद्धीबळ, योगासने, वक्तृत्व, तसेच अन्य स्पर्धा यांमध्येही अग्रेसर असणे : त्याने शाळेत असतांना आर्य चाणक्य आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिका वठवल्या होत्या. शाळेतील बुद्धीबळ, योगासने, वक्तृत्व आणि अन्य कुठल्याही स्पर्धा यांमध्ये शिक्षक प्रथम त्याची निवड करायचे आणि त्याला प्रोत्साहन द्यायचे. त्याच्या आईला सेवेमुळे त्याच्याकडे लक्ष देता येत नव्हते, तरी तो कोणतीही अपेक्षा न ठेवता आनंदाने सर्व करत असे. तो अभ्यासातही तेवढाच हुशार आहे.

२ ए. दळणवळण बंदीच्या कालावधीत शाळा बंद असतांना आश्रमसेवा आनंदाने करणे : कोरोना महामारीमुळे सगळीकडे दळणवळण बंदी असतांना शाळा बंद होत्या आणि कुठेही बाहेर जाता येत नव्हते. तेव्हा तो दायित्व साधक जी सांगेल, ती सेवा आनंदाने करत होता.

२ ऐ. खोलीत आजी-आजोबांना साहाय्य करणे : तो आजी-आजोबांना जेवणाचा डबा आणून देणे, त्यांना खोली आवरण्यासाठी साहाय्य करणे, त्यांना व्यष्टी साधनेसाठी योग्य दृष्टीकोन देणे, हे सर्व आनंदाने करत असे. तो आजोबांनाही आनंदी ठेवत असे आणि त्यांनाही समजावून सांगत असे.

३. दिवसभरात वाचलेली सूत्रे आईला सांगणे आणि आईने त्याच्याकडून व्यष्टी साधनेचे प्रयत्न करवून घेणे

तो सेवा झाल्यावर क्रांतीकारकांवरील पुस्तके वाचण्यात गुंग होत असे. आम्ही काही बोलल्यावर तो थोडासा बोलत असे. त्याची आई सेवा करून आल्यावर तो तिला ‘काय वाचले ?’, याविषयी सांगायचा. त्याची आई त्याच्याकडून व्यष्टी साधनेचे प्रयत्न करून घ्यायची. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे तिच्या माध्यमातून त्याच्याकडून चांगले प्रयत्न झाले आणि त्याच्यावर संस्कार झाले.

४. देवद आश्रमात गेल्यावर तेथील परिस्थिती स्वीकारणे आणि आनंदी रहाणे

तो गोव्यातून देवद आश्रमात गेला आहे. तेथे तो बालसाधक म्हणून एकटाच आहे. त्याने तेथील परिस्थिती स्वीकारली आणि तो आनंदी आहे. तो गेल्यावर आम्हाला वाईट वाटले; मात्र जे होते, ते चांगल्यासाठी होते, हे लक्षात आले.

५. जयेशची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे ऐकून आम्हाला पुष्कळ आनंद झाला आणि आमची परात्पर गुरुमाऊलीच्या प्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.

६. कृतज्ञता आणि प्रार्थना

अशा गुणी मुलाविषयी अन् त्याच्यावर आश्रमात चांगले संस्कार केल्याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे. ‘त्याला हिंदु राष्ट्रासाठी चांगले घडवा आणि त्याची साधना करून घ्या’, हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

– साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक