सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – कोरोनामुळे ज्या बालकांच्या दोन्ही पालकांचा मृत्यू झाला आहे, अशा बालकांची माहिती तातडीने संकलित करण्यात यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी १४ मे या दिवशी दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोरोनाच्या संसर्गाच्या काळात बालकांची काळजी आणि संरक्षण यांचे काम करणार्या संस्थांमधील बालकांना, तसेच कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देणे आणि त्यांचे यथायोग्य संगोपन करणे, यांसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची माहिती घेण्यासाठी सर्व गटविकास अधिकारी, सर्व नगरपालिका, नगरपरिषदा यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी सूचना देऊन याविषयीची माहिती संकलित करण्यात यावी. जिल्ह्यातील सुधारगृह आणि महिलागृह यांमधील बालक आणि महिला, तसेच सर्व कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या.
अनाथ बालकांचा अपवापर होऊ नये, यासाठी माहिती आवश्यक ! – जिल्हा पोलीस अधीक्षक
या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे म्हणाले की, मुले दत्तक देण्याचे प्रकरण, तसेच मुलांविषयी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस विभागाचे काम महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने अशा प्रकारे अनाथ झालेल्या प्रत्येक बालकाची माहिती तातडीने पोलीस विभागास मिळावी. जेणेकरून अशा बालकांचा बाल कामगार म्हणून वापर होणार नाही किंवा त्यांची तस्करी होणार नाही, यासाठी वेळीच सावधानता बाळगता येईल. ही माहिती प्रतिदिन मिळणेही तितकेच आवश्यक आहे.
जिल्ह्यात दळणवळण बंदीमध्ये १ जूनपर्यंत वाढ
सिंधुदुर्ग – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यशासनाने १ जूनपर्यंत दळणवळण बंदी घोषित केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही १ जूनपर्यंत दळणवळण बंदी लागू करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी घोषित केले. या अनुषंगाने निर्बंध न पळणार्यांवर फैजदारी कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणीही त्यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे नवीन ४२९ रुग्ण : ९ जणांचा मृत्यू
१. उपचार चालू असलेले रुग्ण ५ सहस्र ७७
२. बरे झालेले एकूण रुग्ण १३ सहस्र ७३२
३. मृत्यू झालेले एकूण रुग्ण ४५६
४. आतापर्यंतचे एकूण रुग्ण १९ सहस्र २७१