सावंतवाडीत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
सावंतवाडी – येथील नगरपरिषदेच्या माध्यमातून कोरोनाच्या काळात सावंतवाडीतील पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांच्यासाठी १० खाटा राखीव ठेवल्या जाणार आहेत. त्याची व्यवस्था लवकरच नगरपरिषदेच्या स्वतःच्या भूमीत करण्यात येईल, असे आश्वासन सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी दिले.
शासनाच्या वतीने आता १८ वर्षांवरील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. ही लस घेतल्यानंतर ६० दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे पुढील काही कालावधी रक्ताचा तुटवडा भासू शकतो. या पार्श्वभूमीवर युवा रक्तदाता संघटनेने तरुणांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने युवा रक्तदाता संघटना आणि सावंतवाडी पत्रकार संघ यांच्या वतीने १२ मे या दिवशी शहरात आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचा प्रारंभ नगराध्यक्ष परब यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी नगराध्यक्ष परब म्हणाले, ‘‘कोरोनाच्या काळात सर्वच संघटना चांगली सेवा देत आहेत. या काळात पत्रकार संघ आणि रक्तदाता संघटना यांनी आयोजित केलेला रक्तदान शिबिराचा कार्यक्रम कौतुकास्पद आहे.’’
या वेळी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक, सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, जिल्हा परिषद सदस्य गुरुनाथ पेडणेकर, युवा रक्तदाता संघटनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.