प्रत्येकाला आपली वास्तू छान, आनंद देणारी, प्रसन्न, हवेशीर असावी असे वाटते. त्यासाठी आपण तिची दिशा ठरवतो, जागा ठरवतो, चांगला रंग देतो. ‘इंटेरिअर’ चांगले करतो. वास्तू कितीही चांगले झाली, तरी तिच्यातील व्यक्ती जोपर्यंत धर्माचरण करत नाही, साधना करत नाहीत, तोपर्यंत त्यातील चांगली स्पंदने टिकत नाहीत.
सध्याच्या घरांमध्ये आईवडील, पती-पत्नी, बहीण-भाऊ यांच्यात भांडणे चालू असतात. मोठ्याने किंवा वरच्या पट्टीत बोलणे होते, अखंड दूरचित्रवाणी संच चालू असतो. वारंवार मेजवानीसाठी मित्रमंडळी, नातेवाईक यांना बोलावले जाते, चित्रपटातील गाण्यांवर नाच-गाणी होतात. त्यामुळे रज-तमाचे प्रमाण वाढून दाब निर्माण होऊन वाईट शक्ती आकर्षित होतात. त्यामुळे वास्तूत चांगली स्पंदने टिकण्यासाठी खालील काही कृती करू शकतो.
१. अडगळ काढणे आणि वस्तूंची योग्य रचना करणे
वास्तूशास्त्रानुसार प्रत्येक घरात, प्रत्येक खोलीत सुमारे ४७ टक्के वस्तू अनावश्यक असतात. या अनावश्यक वस्तू तेथून बाहेर काढाव्यात आणि उर्वरित वस्तूंची योग्य रचना करावी.
२. विभूती फुंकणे
प्रतिदिन प्रार्थना करून तीर्थक्षेत्राची अथवा यज्ञाची विभूती वास्तूतून बाहेरच्या दिशेने फुंकरावी. विभूतीतील सात्त्विकतेचा वाईट शक्तींना त्रास होतो आणि त्यामुळे त्या दूर पळतात. वास्तूत विभूतीयुक्त तीर्थ शिंपडल्यास त्याचा परिणाम अधिक काळ टिकतो.
३. गोमूत्र शिंपडणे
वास्तूमध्ये गोमूत्र शिंपडल्याने वास्तूतील वाईट शक्तींच्या त्रासाचे निवारण होते. गोमूत्राचे धार्मिक विधींमध्ये आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजेच गोमूत्र हे आरोग्यदायी अन् आध्यात्मिकदृष्ट्याही लाभदायी असते. गोमूत्र न मिळाल्यास पाण्यात उदबत्तीची विभूती घालून ते पाणी शिंपडावे. गोमूत्र किंवा विभूतीचे पाणी शिंपडतांना ते प्रदक्षिणेच्या उलट दिशेने शिंपडावे.
४. धूप करणे
वास्तूत धूप किंवा सात्त्विक उदबत्ती लावावी किंवा कडुनिंबाच्या पानांची धुरी दाखवावी.
५. नामजप करणे
वास्तूच्या शुद्धीसाठी आपल्या उपास्यदेवतेला आणि वास्तूदेवतेला प्रार्थना करून नामजप करावा. स्थूलातील वरील ४ उपायांपेक्षा नामजप अधिक सूक्ष्म, म्हणजेच अधिक प्रभावी असल्याने त्याने सर्वाधिक लाभ होतो.
अ. सनातन संस्थेचे प्रेरणास्रोत प.पू. भक्तराज महाराज यांनी गायलेली भजने किंवा ती उपलब्ध नसल्यास अन्य संतांच्या आवाजातील भजने लावावीत.
(संदर्भ – sanatan.org)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
सूक्ष्म: व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहे. |