‘कु. मधुरा चतुर्भुज हिचा आध्यात्मिक त्रास अल्प व्हावा’, यासाठी किन्नीगोळी (कर्नाटक) येथील संत प.पू. देवबाबा यांनी मनाली (हिमाचल प्रदेश) येथे जाऊन ‘श्री हिडिंबादेवी’ची पूजा करण्यास सांगितले होते. एप्रिल २०१९ मध्ये तेथे जाण्याचे नियोजन केले. त्या वेळी तेथे जातांना आलेल्या अडचणी आणि अडथळे यांवर मात करतांना आम्ही गुरुकृपा अनुभवली. त्याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.
१. ‘पूजाविधीच्या वेळी कु. मधुराच्या मासिक पाळीची अडचण येऊ नये’, यासाठी औषधोपचाराच्या समवेत प्रार्थना आणि उपायकरणे अन् त्यामुळे तिची पाळी योग्य वेळी येणे
आध्यात्मिक त्रासामुळे मधुराची मासिक पाळी अनियमित येत होती. त्यामुळे पूजेच्या वेळी अडचण येऊ नये; म्हणून मासिक पाळी वेळेत येण्यासाठी आधुनिक वैद्यांचे औषधोपचार चालू केले. तेव्हा त्यांनी ‘या मासात मासिक पाळी १० एप्रिलला येईल’, असे सांगितले; परंतु ‘ती १० एप्रिलला न आल्याने पुढे अडचण येईल’, असे वाटले. तेव्हा ही अडचण सुटण्यासाठी संतांना विचारून उपाय आणि प्रार्थना करणे चालू केले. त्यानंतर ही अडचण सुटून तिची मासिक पाळी १२ एप्रिल या दिवशी आली.
२. पूजेसाठी चांगला दिवस बघून पूजेचा दिवस निश्चित केलेला नसूनही गुरुकृपेने तो शुक्रवार आणि हनुमान जयंतीचा दिवस असणे
आम्ही विमानप्रवासाची तिकिटे एक मास अगोदरच आरक्षित केली होती. १७ एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीतील विमानाच्या तिकिटांचे मूल्य अल्प होते; म्हणून १७.४.२०१९ या दिवशी पुणे ते देहली आणि २०.४.२०१९ या दिवशी देहली ते पुणे, अशी विमानाची तिकिटे आरक्षित केली होती. त्यानंतर १९.४.२०१९ हा पूजेचा दिवस ठरवला. हे सर्व करतांना आम्ही पंचांग पाहिले नव्हते. विमानाच्या तिकिटांचे आरक्षण झाल्यावर पंचांगात पाहिले, तर १९.४.२०१९ या दिवशी शुक्रवार हा देवीचा वार होता, तसेच या दिवशी चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती, असा छान योग केवळ गुरुकृपेने जुळून आला होता. ‘आम्ही चांगल्या दिवशी पूजा व्हावी’, असा कोणताही प्रयत्न न करताही ‘हा योग ईश्वरानेच जुळवून आणला’, असे आम्हाला वाटले. हे लक्षात आल्यावर परात्पर गुरुदेवांच्या चरणी सतत कृतज्ञता व्यक्त होत होती.
३. कु. मधुराच्या पायाच्या अंगठ्याच्या नखाला नखुर्डे होणे, मनालीला पोचल्यावर त्यातून रक्त येऊ लागल्याने तिला नीट चालताही न येणे आणि देवाच्या कृपेने मनाली येथील निवासस्थानापासून श्री हिडिंबादेवीचे मंदिर जवळच असल्याने तेथे २ वेळा जाता येणे
मधुराच्या उजव्या पायाच्या अंगठ्याच्या नखाला नखुर्डे झाले होते. आम्ही मनालीला जाण्याच्या आधीच त्यामध्ये पू झाला. त्यासाठी आधुनिक वैद्यांची औषधे घेतली, तरी त्यात सुधारणा होत नव्हती. आम्ही मनाली येथे पोचल्यावर त्यातून रक्त येऊ लागले. त्यामुळे तिला नीट चालताही येत नव्हते; परंतु परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे आमच्या मनाली येथील निवासस्थानापासून श्री हिडिंबादेवीचे मंदिर जवळच होते. त्यामुळे तेथे आम्हाला २ वेळा जाता आले.
४. भगवंताने मुलाच्या मित्राच्या माध्यमातून साहाय्य करून एक प्रवासी वाहतूक करणारी खासगी छोटी गाडी (कॅब) ठरवून देणे आणि त्यामुळे पुढील पूर्ण प्रवास कोणत्याही अडचणीविना सुखरूपपणे पार पडणे
खासगी प्रवास वाहतूक करणार्या आस्थापनाच्या (ट्रॅव्हल्सने) मोठ्या बसने देहली ते मनाली प्रवास करणे फार अडचणीचे होते. हा पूर्ण प्रवास १८ घंट्यांचा होता आणि त्यातही १० घंटे प्रवास घाटातून होता. या १८ घंट्यांत या मोठ्या बसेस केवळ एकदाच थांबतात. त्यामुळे ‘मधुराला या बसने प्रवास करतांना त्रास होणार’, असे लक्षात आले, तसेच मनालीमध्ये फिरतांना पुन्हा रिक्शा मिळवावी लागली असती आणि ‘मनालीमध्ये रिक्शा वहातूक कितपत आहे किंवा नाही ?’, हेही ठाऊक नव्हते. त्यामुळे ‘खासगी वाहतूक करणारी छोटी गाडी ठरवून मनालीला जाणे’, हाच सर्वांत योग्य पर्याय होता. ‘आम्हाला या प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये आणि त्रास होऊ नये’, यासाठीच भगवंताने मुलाच्या मित्राच्या माध्यमातून खासगी गाडीचे आरक्षण करून दिले. हे आरक्षण ‘देहली ते मनाली, मनाली गावात फिरणे आणि नंतर पुन्हा मनाली ते देहली अन् पुढे देहलीच्या विमानतळापर्यंत’ असे होते. त्यामुळे पुढील पूर्ण प्रवास कोणत्याही अडचणीविना सुखरूपपणे पार पडला. त्यामुळे परात्पर गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.
५. आरक्षित केलेल्या खासगी गाडीचा चालक हिंदु असून त्याच्याकडे वाहनात लावण्यासाठी संत कबीर आणि कृष्ण यांची भजने असणे अन् त्यामुळे प्रवासात सत्मध्ये रहाता येणे
देहलीच्या विमानतळावर आम्हाला न्यायला ती आरक्षित केलेली गाडी आली होती. त्या गाडीचा चालक मुलगा हिंदु होता आणि तो चांगला होता. त्याचे नाव कृष्णा होते. त्याच्याकडे वाहनात लावण्यासाठी संत कबीर आणि कृष्ण यांची भजने होती. त्यामुळे पुढील पूर्ण प्रवासातही सत्मध्ये रहाता आले.
६. देवाच्या कृपेने पूजेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता मंदिरातील पुजार्यांची भेट होणे
मनाली येथे पोचल्यावर आम्ही पूजेविषयीची चौकशी करण्यासाठी सायंकाळी ५ वाजता श्री हिडिंबामातेच्या मंदिरात गेलो. त्या वेळी गुरुकृपेने आम्हाला देवळातील पुजारी भेटले. आम्ही त्यांना ‘आम्हाला देवीच्या पूजेसाठी पाठवले आहे’, असे सांगितले. तेव्हा त्यांनी ‘श्री हिडिंबामातेच्या मंदिरात सकाळी ७ वाजता पूजा आणि आरती असते; म्हणून तुम्ही उद्या सकाळी ७ वाजता या’, असे सांगितले.
७. पाऊस पडल्यामुळे थंडीत वाढ होऊनही सकाळी ६ वाजता उठून मंदिरात वेळेत जाता येणे
आम्ही मनालीला पोचण्याच्या आधी २ दिवस तेथे पाऊस पडला होता. त्यामुळे तेथील तापमान उणावून थंडीत वाढ झाली होती. रात्री हिटर (हवा गरम करण्याचे यंत्र) लावून झोपावे लागले. देवाच्या कृपेनेच आम्हाला सकाळी ६ वाजता उठता आले आणि आम्ही आवरून ७ वाजता मंदिरात जाऊ शकलो.
८. श्री हिडिंबादेवीच्या मंदिराच्या गाभार्यात बसायला मिळणे, देवीची पूजा आणि आरती भावपूर्ण होणे अन् मंदिरात बसून नामजप केल्यावर पुष्कळ प्रसन्न जाणवणे
आम्ही श्री हिडिंबादेवीच्या मंदिरात गेल्यावर पुजार्यांनी पूजा चालू होण्याआधीच आम्हाला देवीच्या गाभार्यात बसवले होते. त्यामुळे आम्हाला देवीची पूजा आणि आरती पहाता आली. त्यानंतर मी तेथील पुजार्यांना ‘इथे कोणता मंत्रजप करायचा ?’, असे विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘श्री हिडिंबादेवी श्री दुर्गादेवीचाच अवतार आहे; म्हणून तिचा नामजप केला, तरी चालेल.’’ मग आम्ही तेथे बसून श्री दुर्गादेवी आणि श्रीकृष्ण यांचा ३० मिनिटे नामजप केला. त्यानंतर त्या पुजार्यांनी देवीच्या पुढ्यातील फुले आणि प्रसाद देऊन आम्हाला आशीर्वाद दिला. तो मंदिर परिसर सात्त्विक आणि निसर्गरम्य होता. त्यामुळे त्या भावपूर्ण वातावरणात पुष्कळ प्रसन्नता जाणवत होती.
९. मधुराला तीव्र आध्यात्मिक आणि अंगठ्याच्या नखुर्ड्याचा शारीरिक त्रास होत असूनही परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे संपूर्ण प्रवास शांतपणे होणे
आम्ही ‘देहली ते मनाली’ आणि पुन्हा ‘मनाली ते देहली’, असा जाता-येतांना ६०० कि.मी. आणि ६०० कि.मी. असा एकूण १ सहस्र २०० कि.मी. प्रवास आरक्षित केलेल्या गाडीने केला. या प्रवासात एकूण ६०० कि.मी. घाटाचा रस्ता होता. मधुराच्या अंगठ्यातून रक्त येत होते आणि तिला आध्यात्मिक त्रासही होत होता, तरी ती परात्पर गुरुदेवांच्या कृपेने शांत होती. केवळ परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळेच हा एवढा मोठा आणि अवघड प्रवास व्यवस्थित अन् शांतपणे पार पडला.
१०. देहली सेवाकेंद्रातील परात्पर गुरुदेवांच्या पादुकांसमोर बसून नामजप करतांना कु. मधुराला अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास होणे आणि तिच्यासाठी उपाय केल्यावर ती शांत होणे
‘मनाली ते देहली’ हा प्रवास संपल्यावर आम्ही परत येतांना देहली सेवाकेंद्रात गेलो होतो. आम्ही तेथे ४ घंटे होतो. तेथील ध्यानमंदिरात परात्पर गुरुदेवांच्या चैतन्यमय पादुका आहेत. त्यांच्यासमोर बसून आम्ही नामजप करायला लागल्यावर मधुराचा आध्यात्मिक त्रास वाढला. नंतर ती ‘इथे थांबायला नको. घरी चला’, असे म्हणायला लागली. तिच्यासाठी उपाय केल्यावर थोड्या वेळाने ती शांत झाली. देहली सेवाकेंद्रात आम्हाला परात्पर गुरुदेवांच्या कृपेने पू. कर्वेमामांचा सत्संग मिळाला.
११. कृतज्ञता
परात्पर गुरुदेवांच्या कृपेने २ सहस्र कि.मी.चा प्रवास करून हा पूजाविधी व्यवस्थितपणे पार पडला. ‘आम्ही कसे गेलो आणि कसे परत आलो ?’, हे आम्हाला समजलेही नाही. ही सर्व श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरुदेवांचीच कृपा आहे. त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. मोहन चतुर्भुज, पुणे (१२.५.२०१९)
श्री हिडिंबादेवीच्या मंदिरात देवीशी सूक्ष्मातून झालेले संभाषण !‘श्री हिडिंबादेवीच्या मंदिरात पूजेच्या आधी आम्ही गाभार्यात ध्यानाला बसलो होतो. तेव्हा मी देवीला प्रार्थना केल्यावर माझे श्री हिडिंबादेवीशी सूक्ष्मातून झालेले संभाषण पुढे दिले आहे. मी : माताजी, आपके दर्शन के लिये हम आये है । हमारा प्रणाम स्वीकार करे । श्री हिडिंबादेवी : आपको स्वयं प्रभुने मेरे पास भेजा है । मी : हां माते, मधुरा को अनिष्ट शक्तियोंका कष्ट है, वो कष्ट दूर होने के लिये हम उसे यहां लेकर आये है । श्री हिडिंबादेवी : उसके कष्ट दूर होंगे । जो धर्म के मार्ग पर चलते है, उन्हे कष्ट होते ही है और प्रभु की कृपाभी होती है । मेरी भी कृपा उनपर होगी । मी : माते, सनातन के साधकाेंको अनिष्ट शक्तियोंकी बहुत पीडा है । श्री हिडिंबादेवी : आप लोग धर्म के मार्ग पर चल रहे है, तो पीडा होनीही है । ईश्वर आपके साथ है । आपके सभी दुःख और कष्ट स्वयं प्रभु दूर करेंगे । मी : हां माते, हम आपके शरण में है । हमारा प्रणाम स्वीकार करे ।’ – श्री. मोहन चतुर्भुज, पुणे (१२.५.२०१९) |
श्री हिडिंबादेवीच्या मंदिरात गेल्यावर आलेल्या अनुभूती१. ‘१९.४.२०१९ या दिवशी श्री हिडिंबादेवीच्या मंदिरात गेल्यावर लगेचच माझा श्रीकृष्णाचा नामजप आपोआप चालू झाला आणि नंतर पूजा चालू झाली. २. श्री हिडिंबादेवीची पूजा चालू झाल्यावर मला सर्वत्र पिवळा प्रकाश पसरलेला दिसला आणि ‘आरती करतांना विशिष्ट वाद्ये वाजवली जात आहेत’, असे जाणवले. ३. पूजा झाल्यावर श्री हिडिंबादेवीचा मुखवटा जिवंत वाटत होता आणि मूर्तीत शक्ती जाणवत होती. ४. मला श्री हिडिंबादेवीची मानसपूजा करण्याची इच्छा झाली आणि मी देवीची मानसपूजा करून तिच्या चरणी साडी-चोळी अर्पण केली. ५. पुजार्यांनी ‘श्री दुर्गादेवीचा जप करा’, असे सांगितल्यावर माझा श्री दुर्गादेवीचा जप चालू झाला. तेव्हा माझा भाव जागृत झाला होता. ६. मला पुष्कळ शारीरिक त्रास होत होता, तरी अनुष्ठान पार पडले आणि ‘ही देवीची कृपा आहे’, अशी माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.’ – कु. मधुरा चतुर्भुज, पुणे (१२.५.२०१९) |
|