कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एस्.टी. कर्मचार्‍यांच्या वारसांना ५० लाख आर्थिक साहाय्य द्या ! – अनिल परब, परिवहन मंत्री

मुंबई – कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यूमुखी पडलेल्या एस्.टी. कर्मचार्‍यांच्या वारसांना शासनाकडून ५० लाख रुपये आर्थिक साहाय्य देण्यात यावे, अशी मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.

मार्च २०२० पासून कोरोना महामारीच्या काळात शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांची वाहतूक, लाखो परप्रांतीय मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत नेऊन सुखरूप पोचवणे, अत्यावश्यक आणि कृषीजन्य मालाची वाहतूक करणे, वैद्यकीय ऑक्सिजन आणण्यासाठी टँकरला चालक पुरवणे, शासकीय रुग्णवाहिकांना चालक पुरवणे अशा अनेक कामांमध्ये धोका पत्करून एस्.टी.च्या कर्मचार्‍यांनी सेवा बजावली आहे. यामध्ये अनेक कर्मचारी कोरोनाबाधित होऊन मृत्यूमुखी पडले आहेत.