खंडाळा (जिल्हा सातारा) येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची कारखाने बंद करण्याची मागणी

सातारा, ८ मे (वार्ता.) – कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता खंडाळा औद्योगिक वसाहतीमधील कारखाने बंद करावेत, या मागणीसाठी सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी प्रशासनाची खंडाळा तहसील कार्यालयावर प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. तसेच ७ ते २३ मे या कालावधीत कारखाने बंद न केल्यास सामूहिक आत्मदहन करण्याची चेतावणी खंडाळ्याचे तहसीलदार दशरथ काळे यांना निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.

खंडाळा तालुक्यातील औद्योगिकरणामुळे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. सातारा जिल्ह्यात दळणवळण बंदीचे नियम कडक करण्यात आले आहेत. तरीही प्रतिदिन २ सहस्रांहून अधिक नागरिक कोरोनाबाधित होत असून प्रतिदिन ३० हून अधिक बाधितांचे मृत्यू होत आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी आणि कारखाने बंद ठेवण्यासाठी खंडाळ्याचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.