१. सेवा करतांना मानेच्या उजव्या बाजूला कुणीतरी जड गोळा ठेवल्याप्रमाणे वाटणे, प.पू. भक्तराज महाराज यांनी ‘खोका मानेसमोर धर’, असे सूक्ष्मातून सांगणे
‘मी सेवा करतांना प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) आणि त्यांचे शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांची छायाचित्रे अन् श्रीकृष्णाचे चित्र जवळ घेऊन बसते. त्या वेळी ‘त्यांचे माझ्यावर लक्ष आहे’, असा माझा भाव असतो. आज सेवा करतांना अकस्मात् माझ्या मानेच्या उजव्या बाजूला कुणीतरी जड गोळा ठेवल्याप्रमाणे वाटले. त्यामुळे मला मान वळवणे कठीण झाले. मला मानेचे स्नायू आखडल्यासारखे वाटू लागले; म्हणून मी श्रीकृष्ण आणि गुरु यांना प्रार्थना केली. माझा त्रास अधिकच वाढू लागला; म्हणून मी प.पू. बाबांना म्हणाले, ‘मला सेवा करण्यात हा काय अडथळा आहे ?’ तेव्हा प.पू. बाबा मला सूक्ष्मातून म्हणाले, ‘खोका मानेसमोर धर.’ (मी प.पू. बाबांचे छायाचित्र आणि श्रीकृष्णाचे चित्र दोन खोक्यांत लावले आहे.)
२. प.पू. बाबांचे छायाचित्र लावलेल्या खोक्यातून उष्ण लहरी येणे आणि श्रीकृष्णाच्या चित्रात जिवंतपणा जाणवणे
मी श्रीकृष्णाचे चित्र लावलेला खोका समोर ठेवला आणि प.पू. बाबांचे छायाचित्र लावलेला खोका डाव्या हाताने मानेकडे तोंड करून धरला अन् उजव्या हाताने सेवा करू लागले. ५ ते १० मिनिटांनी प.पू. बाबांचे छायाचित्र असलेल्या खोक्यातून मला उष्ण लहरी जाणवू लागल्या. मी श्रीकृष्णाला याविषयी सांगण्यासाठी त्याच्याकडे पाहिले, तर समोरच्या खोक्यातील श्रीकृष्णाच्या चित्रात जिवंतपणा जाणवून त्याच्याभोवती चैतन्याचा पाऊस पडत होता. मला काही कळेना; म्हणून मी अजून बारकाईने पाहू लागले, तर श्रीकृष्णाच्या कपड्यांवर चैतन्याचे कण चमकत होते.
३. परात्पर गुरुदेवांनी ‘दृष्ट काढली पाहिजे’, असे सांगणे आणि हनुमानाने नारळाने दृष्ट काढणे
ते पहात असतांना सूक्ष्मातून परात्पर गुरुदेव आले. त्या वेळी श्रीकृष्ण आणि प.पू. बाबा बाजूला बसले. गुरुदेव मला प्रेमाने ‘कुठे त्रास होतो ?’, असे विचारू लागले. त्या वेळी मी त्यांना माझी मान एका बाजूने जड झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘दृष्ट काढली पाहिजे.’ तेव्हा एका क्षणाचाही विलंब न करता हनुमान प्रगट झाला. त्याने ‘मी दृष्ट काढतो’, असे म्हणत त्याच्या शेपटीत नारळ पकडला आणि माझ्याभोवती फिरवून पाताळात फेकून दिला. तो नारळ पाताळात मोठ्या वाईट शक्ती करत असलेल्या यज्ञात पडला आणि ती त्रासदायक शक्ती नष्ट झाली. हनुमानाने असे ३ वेळा केले आणि अखेर तो पाताळात जाऊन त्याने त्या मोठ्या वाईट शक्तींचा समूळ नाश केला. त्यानंतर मला चांगले वाटू लागले; परंतु मानेचा जडपणा तसाच होता.
४. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्यांचा उजवा हात डाव्या खांद्यावर ठेवणे आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी मानेला लेप लावल्यावर मान पूर्ववत होणे
त्यानंतर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आल्या. गुरुदेवांनी त्यांना सांगितले, ‘हिच्याकडे जरा लक्ष द्या.’ तेव्हा त्या दोघी ‘हो’ म्हणाल्या. माझी सेवा चालूच होती. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्यांचा उजवा हात माझ्या डाव्या खांद्यावर ठेवला. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी हळदीसारख्या रंगाचा लेप आणला होता. त्यांनी तो लेप उजव्या हाताने माझ्या मानेच्या उजव्या बाजूला लावला. त्या लेप लावत असतांना माझ्या मानेला हलकेपणा जाणवू लागला. ५ मिनिटांनी माझी मान पूर्ववत झाली आणि त्याच वेळी माझी सेवा पूर्ण झाली.
५. कृतज्ञता
मी सेवा करतांना माझ्या मनात कधीकधी कर्तेपणाचे विचार येतात; पण ‘हे विचार व्यर्थ असून देव आणि गुरु यांच्याच कृपेने मी सेवा पूर्ण करू शकते’, हे माझ्या लक्षात आले. मी देवाला शरण गेले. ‘देव आणि गुरु यांनी माझ्याकडून सेवा करवून घेऊन माझा त्रास दूर केला’, हे पाहून माझे मन कृतज्ञतेने भरून आले. ‘देवा, तू माझी पुष्कळ काळजी घेतोस आणि माझे रक्षण करतोस ! यासाठी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. भारती बागवे, कॅनडा (४.३.२०००)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |