मायेची आसक्ती नसलेली, प्रत्येक कृती मनापासून करणारी आणि संतांविषयी अपार श्रद्धा असलेली ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची फोंडा, गोवा येथील कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (वय १० वर्षे) !

कु. श्रिया राजंदेकर

चैत्र कृष्ण पक्ष एकादशी, म्हणजेच वरुथिनी एकादशी (७.५.२०२१) या दिवशी कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर हिचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने तिच्या आई-वडिलांना जाणवलेली तिची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत. काल म्हणजे ७ मे या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण कु. श्रिया हिच्यामधील ‘सहजता’, ‘प्रत्येक कृती मनापासून करणे’, ‘सतत अनुसंधानात असणे’ आदी विविध गुण पाहिले. या लेखाचा उर्वरित भाग येथे देत आहोत.

७ मे या दिवशी प्रसिद्ध झालेला लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/474851.html


९. प्रगल्भता दाखवणारे श्रियाचे आध्यात्मिक विचार !

९ इ. संतांच्या वस्तू चप्पलाच्या मांडणीवर ठेवलेल्या पाहून वाईट वाटणारी आणि अशांवर स्वभावदोषांचे अन् मायेचे घट्ट आवरण असून ‘त्यांच्यावर देवाची कृपा कशी होणार ?’, असे म्हणणारी श्रिया ! : मध्यंतरी आम्ही एका साधकाच्या घरी गेलो होतो. त्यांच्याकडे एक संतही आले होते. त्यांच्या घरातील सर्वच जण साधना करतात. त्या संतांच्या वस्तू चप्पल ठेवायच्या मांडणीवर ठेवल्या होत्या. ते पाहिल्यावर श्रियाला वाईट वाटले. ती घरी आल्यावर मला म्हणाली, ‘‘आई, एका संतांच्या चरित्रात आपण बघितले, ‘देव सांगतो, ‘सध्या मनुष्याच्या डोळ्यांवर मायेची आणि त्याच्या स्वभावदोषांची घट्ट पट्टी आहे. इतके आवरण आहे की, प्रत्यक्ष देव समोर आला, तरी ते त्याला ओळखू शकणार नाहीत.’ तसे आहे बघ हे. संत हे ईश्‍वराचे रूप असते ना ? मग त्यांच्या वस्तू अशा ठिकाणी ठेवल्या, तर देवाची कृपा कशी होणार ?’’

१०. ‘श्रियामधील हे सर्व दैवी गुण पहाता, गुरुदेव आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ तिला घडवत आहेत’, असे वाटणे, ‘ती स्वतःची मुलगी आहे’, यासाठी स्वतःला भाग्यवान समजणे

कु. श्रियामधील हे गुण पाहून आणि तिचे आध्यात्मिक विचार ऐकून आम्हाला वाटते, ‘हे सर्व आम्ही तिला शिकवले नाही. मग हे सर्व दैवी गुण इतक्या लहान वयात तिच्यात कुठून आणि कसे आले ?’ याचे एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे ‘परम पूज्य डॉक्टर !’ हे त्यांचे गुण आहेत. ही शिकवणही त्यांचीच आहे. हे सर्व दैवी आहे. ‘श्रिया आमची मुलगी आहे’, हे आमचे भाग्यच आहे. हे भाग्य प.पू. गुरुदेवांनी आमच्या पदरात घातले आहे; पण तिला घडवणारे तुम्हीच आहात गुरुदेव ! ‘कधी प.पू. गुरुदेव, तर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ तिला घडवत आहेत’, याची आम्ही क्षणोक्षणी अनुभूती घेत आहोत.

(‘प.पू. गुरुदेव, मागे एकदा तुम्ही मला म्हणाला होतात, ‘मानसी, ही दोन्ही मुले आई-वडिलांना नमस्कार करायला लावणारी आहेत.’ परात्पर गुरु डॉक्टर, पू. वामन यांच्या संतत्वाची अनुभूती आम्ही आपल्या कृपेने घेतच आहोत; पण जेव्हा आम्ही श्रियाचे आध्यात्मिक विचार ऐकतो, तेव्हा तुमच्या या (वरील) वाक्याची मला आठवण येते.’ – मानसी.)

‘परात्पर गुरुदेव, आपल्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. अशीच आपली अखंड कृपादृष्टी असावी’, हीच आपल्या कोमल चरणी प्रार्थना.’

– सौ. मानसी आणि श्री. अनिरुद्ध राजंदेकर, फोंडा, गोवा. (११.४.२०२१)


परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने घरात त्यांची सुंदर आणि चैतन्यमय खोली सिद्ध करणारी कु. श्रिया राजंदेकर (वय १० वर्षे) !

कु. श्रिया हिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने घरातील वस्तूंचा वापर करून बनवलेली त्यांची चैतन्यमय खोली !

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ‘काहीतरी वेगळे करावे’, असे विचार येणे

‘गेले काही दिवस माझ्या मनात ‘यावर्षी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाला काय करावे ? काहीतरी वेगळे करावे’, असे विचार सतत येत होते. मागच्या वर्षी मी प.पू. गुरुदेव, सद्गुरु बिंदामावशी (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ) आणि सद्गुरु काकू (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) यांच्यासाठी कमळाचे फूल बनवले होते.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर घरात त्यांची खोली बनवण्याचा विचार येणे

२८.४.२०२१ या दिवशी मी याविषयी आईशी बोलले. आम्ही दोघींनीही प.पू. गुरुदेवांना प्रार्थना केली आणि आमच्या दोघींच्याही मनात प.पू. गुरुदेवांची खोली बनवण्याचा विचार आला. मग मी आईच्या साहाय्याने आधी त्यासाठी लागणार्‍या साहित्याची सूची केली आणि ते सर्व साहित्य, जसे खोक्याचे पुठ्ठे, रिकाम्या काड्यापेट्या, रंगीत कागद इत्यादी सर्व एकत्र केले. नंतर देवाला प्रार्थना करून सर्वांची रंगसंगती निश्‍चित केली

३. नियोजनाप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीसाठी साहित्य सिद्ध करून खोली बनवून पूर्ण करणे आणि खोलीत त्यांचे छायाचित्र ठेवल्यावर ‘ते प्रत्यक्ष तेथेच आहेत’, असे वाटून पुष्कळ भावजागृती होणे

२९.४.२०२१ या दिवशी आम्ही ठरवलेल्या टप्प्याप्रमाणे एक-एक करत त्यांच्या खोलीतील साहित्य बनवले. ३०.४.२०२१ या दिवशी दुपारी खोली बनवून पूर्ण झाली. देवानेच मला छोट्या नामपट्ट्या मिळवून दिल्या. त्यामुळे आम्हाला पुष्कळ आनंद झाला. सर्व खोली सिद्ध झाल्यावर मी त्यात प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र ठेवले. तेव्हा माझा आणि आईचा भाव जागृत झाला अन् ‘ही खरोखर त्यांचीच खोली आहे आणि परम पूज्य प्रत्यक्ष तिथे बसले आहेत’, असे आम्हाला जाणवत होते. त्या खोलीकडे पाहून मला पुष्कळ शांत आणि स्थिर वाटत होते.

४. घरात सिद्ध केलेल्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीची छायाचित्रे पाहून श्री. अनिरुद्ध राजंदेकर आणि संत यांनी व्यक्त केलेले अभिप्राय !

४ अ. श्री. अनिरुद्ध राजंदेकर : माझे बाबा आश्रमात होते; म्हणून मी बाबांना खोलीचे छायाचित्र काढून पाठवले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘खोली बघून शांत आणि निर्विचार वाटले.’’

४ आ. बालसंत पू. वामन राजंदेकर : पू. वामन यांना खोली दाखवल्यावर त्यांनी वाकून नमस्कार केला आणि ते ‘‘श्रियाताई, नारायणाची खोली’’, असे आनंदाने म्हणाले.

४ इ. पू. संदीप आळशी : मी पू. संदीपकाकांना खोलीचे छायाचित्र बघायला पाठवले. तेव्हा त्यांनी मला लघुसंदेश पाठवला, ‘खोली बघून पुष्कळ भाव जागृत झाला. खोली खरोखर सुंदर आणि चैतन्यमय आहे.’

प.पू. गुरुदेवांंच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता ! त्यांनीच माझ्याकडून हे बनवून घेतले आणि आम्हाला इतका आनंद दिला ! ही खोली बनवण्यासाठी मला आईने पुष्कळ साहाय्य केले; म्हणून आईप्रतीही कृतज्ञता !’

– कु. श्रिया राजंदेकर (वय १० वर्षे), फोंडा, गोवा. (४.५.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक