हनुमानाच्या जयंतीच्या दिवशी सकाळी एक वानर सेवाकेंद्राच्या गच्चीत येतांना दिसणे आणि ‘प्रत्यक्ष मारुतीराया या वानराच्या रूपात येऊन सर्वांना दर्शन देत आहे’, असे जाणवून साधकाची पुष्कळ भावजागृती होणे
‘२६.४.२०२१ या दिवशी साधारणपणे दुपारी ४ वाजता मी कुडाळ सेवाकेंद्रात विश्रांती घेत असतांना सद्गुरु सत्यवान कदम माझ्या स्वप्नात आले आणि ‘त्यांनी मला मिठीत घेतले’, असे दृश्य दिसले. त्यामुळे माझ्या मनाला अतिशय आनंद झाला. ‘उद्या हनुमान जयंतीच्या दिवशी प्रत्यक्ष मारुतीराया सेवाकेंद्रात येणार आहे’, असा विचार येऊन माझे मन पुष्कळ आनंदी झाले. मध्यरात्री २.३० वाजता मला जाग आली. त्या वेळी मला मारुतीरायाचे सूक्ष्मातून दर्शन झाले आणि माझा आपोआप नामजप होऊ लागला.
हनुमान जयंतीच्या दिवशी पहाटे ५.३० ते ६.३० या वेळेत कुडाळ सेवाकेंद्रातील सर्व साधकांचे सद्गुरु सत्यवानदादांसह नामजपाला बसण्यासाठी नियोजन होते. त्यासाठी मी पहाटे ३.३० वाजता उठून तातडीची सेवा आणि वैयक्तिक आवरून नामजपाच्या ठिकाणी उपस्थित राहिलो. त्या वेळी माझा नामजप आतून होत असून मला मारुतीरायाचे सूक्ष्मातून दर्शन होत होते. नामजप झाल्यावर मी एका सेवेसाठी सेवाकेंद्राच्या बाहेर आल्यावर एक वानर सेवाकेंद्राच्या गच्चीत येतांना दिसले. ‘प्रत्यक्ष मारुतीराया या वानराच्या रूपात येऊन सर्वांना दर्शन देत आहे’, असे जाणवून माझी पुष्कळ भावजागृती झाली.’
(‘कलियुगात जन्माला आलेल्या व्यक्तींपैकी बहुतांश व्यक्ती भुवर्लोक आणि पाताळ येथून जन्माला आलेल्या आहेत. त्यामुळे अशा रज-तमप्रधान व्यक्तींभोवतीचेे वायूमंडलही रज-तमप्रधान असते; परंतु साधना करणार्या जिवांभोवतीचे वायूमंडल साधनेमुळे सत्त्वप्रधान झालेले असते. भारतीय संस्कृतीमध्ये प्राणी आणि पक्षी यांना विशेष महत्त्व आहे. काही प्राणी आणि पक्षी यांच्यामध्ये संबंधित देवतेचे तत्त्व आकृष्ट होते. त्यांच्यामध्ये सूक्ष्मातील कळण्याची क्षमता असते. या क्षमतेमुळे त्यांची ओढ अधिक सात्त्विक अशा वनस्पती, साधक, संत आणि वातावरण यांच्याकडे असते. काही प्राणी आणि पक्षी यांची सात्त्विकता सर्वसाधारण प्राण्यांपेक्षा अधिक असू शकते आणि त्यामुळे ते सात्त्विकतेकडे अधिक प्रमाणात आकर्षित होतात. जेवढी सात्त्विकता अधिक, तेवढे आकर्षणाचे प्रमाण अधिक असते. वानरामध्ये हनुमानाचे तत्त्व कार्यरत असते. त्यामुळे हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी वानररूपी हनुमानाने कुडाळ येथील सेवाकेंद्रात साधकांना दर्शन दिले.’ – संकलक)
– श्री. सुरेंद्र चाळके, कुडाळ सेवाकेंद्र (२७.४.२०२१)
|