श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने !

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ

१. देहात ‘मनमंदिर’ निर्माण करणे

‘मन शुद्ध असेल, तरच त्याचे मंदिर होते. जिथे शुद्धता असते, तिथे सात्त्विकता येते. सात्त्विक ठिकाणीच भगवंताचा वास असतो. ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलन-प्रक्रियेने मन शुद्ध अन् पवित्र झाल्याने देहात ‘मनमंदिर’ निर्माण होते.

२. भगवंताच्या अनुसंधानामुळे मन तणावमुक्त आणि शांत होणे

भगवंताचे अनुसंधान मनुष्याला तणावमुक्त करते. तणावमुक्त मन हे शांतीचे माहेरघरच असते. शांतीच्या स्पर्शामुळे मनुष्याचे आयुष्य वाढते. योग्यांचे असेच असते. सर्वसामान्य मनुष्यापेक्षा योग्यांच्या दोन श्‍वासांतील अंतर अधिक असते. त्यामुळे योग्यांचे आयुष्यमान इतरांपेक्षा अधिक असते.

३. ‘समजून घेणे आणि सांभाळून घेणे’, म्हणजे साधना !

‘समजून घेणे, म्हणजे ‘अध्यात्म समजून घेणे’ आणि ‘सांभाळून घेणे, म्हणजे ‘अध्यात्म समजून स्वतः तसे जगणे अन् इतरांनाही आध्यात्मिक आनंदी आयुष्य जगण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांना साधनेत पुढे जाण्यास साहाय्य करणे.’

४. संगीतकला आणि वाद्यकला यांच्या माध्यमातून होणारी साधना

४ अ. संगीतकला : संगीतकलेमध्ये देहाची आतून साधना होते. संगीत साधनेत साधकाचा देहच माध्यम असल्याने निर्माण होणारे चैतन्य थेट देहावर अंतर्बाह्य परिणाम करते.

४ आ. वाद्यकला : वाद्यकलेमध्ये देहाची बाहेरून साधना होते. बाह्यवस्तूचा आधार घेऊन चैतन्य निर्माण करावे लागते. वाद्यकलेच्या माध्यमातून देवापर्यंत जाणे संगीत साधनेच्या तुलनेत कठीण असते; परंतु देवाप्रती भाव असेल, तर अशक्य असे काहीच नसते. कलाकारात भाव असेल, तरच वाद्य ‘देवता’ बनून कलाकाराची अंतर्बाह्य शुद्धी घडवून आणते.

५. कला-उपासक आणि कलाकार यांच्यातील भेद

५ अ. कला-उपासक : जो निरपेक्ष भावाने आणि त्यागी वृत्तीने ‘ईश्‍वरप्राप्ती’ हा उद्देश ठेवून कलेची साधना करतो, तो ‘कला – उपासक’ होय. कला-उपासक म्हणजे ‘कला हेच ज्याचे उपास्य दैवत आहे असा तो.’

५ अ १. कला-उपासक म्हणजे कलेची उपासना करणारा, म्हणजे कलेलाच देव समजून समर्पित भावाने त्याच्या कलेचे सादरीकरण करणारा : ‘कलाकार’ या शब्दाच्या तुलनेत ‘कला-उपासक’ या शब्दाचा उच्चार करतांना आनंद वाटतो आणि चांगले जाणवते. ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या अध्यात्मशास्त्राच्या सिद्धांतानुसार जसा शब्द, तशी त्यातून निर्माण होणारी शक्ती वेगवेगळी असते. कला-उपासक हा कलेलाच देव समजून आणि तिच्याप्रती समर्पित भाव ठेवून आपल्या कलेचे लोकांसमोर सादरीकरण करतो. यालाच ‘कला-उपासना’ करणे, असे म्हणतात. आजकाल असे कला-उपासक दुर्मिळ झाले आहेत.

५ आ. कलाकार : हा लोकेषणेसाठी केवळ व्यावहारिक दृष्टी ठेवून कला शिकतो आणि ती लोकांसमोर सादर करतो. तो निवळ बाह्यांगी ‘कलाकार’ असल्याने त्याला ‘उपासक’ ही उपमा देणे योग्य नाही.

६. द्वैत नष्ट करणे

ही साधनेतील एक प्रक्रिया आहे. ‘तू’ (देव) आणि ‘मी’ वेगळे आहोत’, या विचाराचे निर्मूलन होणे, याला ‘द्वैत नष्ट होणे’, असे म्हणतात.

७. द्वैतभाव संपणे

‘स्वभावदोष निर्मूलना’च्या प्रक्रियेतून ‘मी’चे अस्तित्व संपून जाते, तर ‘अहं निर्मूलना’च्या प्रक्रियेतून देवाशी एकरूप होणे सोपे जाते. यालाच ‘द्वैतभाव संपणे’, असे म्हणतात.

८. मनोविकार

मनोविकारांवर मात करण्यासाठी आपले आत्मबळ वाढवणे आवश्यक असते. त्यासाठी ‘भगवंताचे नाम’ ही आपली आत्मऊर्जा आहे. नामाच्या शक्तीने ईश्‍वराचे अनुसंधान वाढण्यास साहाय्य होते. ईश्‍वरी अनुसंधानाच्या ऊर्जेने आत्मबळ वाढून मनातील विकार दूर होतात. त्याने मनोबळही आपोआपच वाढते. मनाच्या दैवी शक्तीमुळे आत्म्यातील चिरंतन शक्तीची जाणीव होण्यास साहाय्य होते.’

– ( श्रीचित्‌शक्‍ति ) सौ. अंजली गाडगीळ (४.४.२०२०)