‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
कोरोनामुळे एस्.टी.च्या २०५ कर्मचार्यांचा मृत्यू
मुंबई – कोरोनामुळे आतापर्यंत एस्.टी. महामंडळातील २०५ कर्मचार्यांचा मृत्यू झाला आहे, तर कोरोनाबाधित कर्मचार्यांची संख्या ७ सहस्र ७०८ इतकी आहे. आतापर्यंत ६ सहस्र ३४ कर्मचारी उपचार घेऊन घरी परत गेले, तर १ सहस्र ४७० कर्मचार्यांवर उपचार चालू आहेत. १ लाख कर्मचार्यांपैकी ३० सहस्र ६९३ कर्मचार्यांचेच लसीकरण झाले आहे. दळणवळण बंदीमुळे एस्.टी.ची राज्यातील सेवा बंद असली, तरी मुंबई महानगरात अत्यावश्यक सेवांसाठी एस्.टी. चालू आहे. निर्बंध शिथिल झाल्यानंतर राज्यातील एस्.टी. सेवा पूर्ववत् झाली. त्यानंतर कोरोनाबाधित कर्मचार्यांच्या संख्येत वाढ झाली.
कोरोनाची लागण होऊन मृत झालेल्या एस्.टी.तील ११ कर्मचार्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य मिळाले आहे. अन्य कर्मचार्यांना आर्थिक किंवा अन्य साहाय्य देण्याविषयी अजूनपर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही. उर्वरित मृत कर्मचार्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा निर्णय घेतला होता; मात्र यातील एकालाही नोकरीचे पत्र मिळाले नाही.
रेमडेसिविरचा साठा करून फसवणूक केल्याप्रकरणी ‘सिटी हॉस्पिटल’वर गुन्हा नोंद
सोलापूर – रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा करून फसवणूक केल्याप्रकरणी येथील ‘सिटी हॉस्पिटल’वर महापालिका आयुक्तांनी गुन्हा नोंद केला आहे. महापालिका आरोग्य विभागाकडून याची प्राथमिक तपासणी केली असता इंजेक्शनची साठवणूक केल्याचा प्रकार समोर आला. प्रत्येक रुग्णालयाकडून प्रति दिवशी रुग्णनिहाय इंजेक्शनची मागणी प्रशासनाला दिली जाते. त्या मागणीनुसार अन्न आणि औषध विभागाच्या माध्यमातून रुग्णालयाला इंजेक्शनचा पुरवठा केला जातो; मात्र ‘सिटी हॉस्पिटल’ने केलेल्या मागणीवरून रुग्णांची प्रत्यक्ष माहिती मागवली असता, यामध्ये जुन्याच रुग्णांच्या नावाने नवीन साठा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे आढळून आले.
कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव त्वरित कळवा !आपणासही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा. समाजाच्या प्रबोधनासाठी असे अनुभव त्वरित लिखित स्वरूपात कळवणे, ही काळानुसार समष्टी साधना आहे, हे लक्षात घेऊन येणारे कटू किंवा चांगले अनुभव त्वरित पाठवावेत. आरोग्य साहाय्य समितीपत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१. संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१० ई-मेल पत्ता : [email protected] |
कोरोनाच्या संसर्गात निष्काळजीपणा न करता वेळेवर औषधोपचार करून प्राणरक्षणासाठी योग्य क्रियमाण वापरा !
भारतात मार्च २०२० पासून वैश्विक महामारी असलेल्या ‘कोविड’ने थैमान घातले आहे. मागील वर्षभरात याचा संसर्ग पसरण्यास रुग्णांच्या दृष्टीने पुढील दोन प्रमुख कारणे असल्याचे लक्षात येते. १. सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे, समारंभामध्ये सहभागी न होणे इत्यादी मूलभूत गोष्टी अनेक वेळा माध्यमांतून सांगूनही व्यक्तीचे गांभीर्य न्यून पडते अन् अनेकांकडून निष्काळजीपणे वागणे होते. २. औषधोपचार घेण्यात विविध माध्यमांमधून प्रबोधन होत असूनही रुग्ण आजाराची लक्षणे स्वत:मध्ये आढळल्यास ती जाणीवपूर्वक लपवून ठेवतात. वेळेवर औषधोपचार घेत नाहीत. त्यामुळे विषाणूचा संसर्ग बळावत जाऊन रुग्णांना जीव गमवावा लागल्याची उदाहरणे आढळत आहेत. साधकांनी या दोन्ही चुका टाळून सर्दी, खोकला, घसा दुखणे, कणकण, ताप, वास न येणे, जुलाब होणे यांसारखी कोणतीही लक्षणे आढळल्यास तातडीने औषधोपचार घेणे आवश्यक आहे. कोरोनावर यशस्वी उपचार केलेल्या डॉक्टरांकडून औषधोपचार घेण्यास प्राधान्य द्या !आपल्या भागात कोरोनावर यशस्वी उपचार केलेले ॲलोपॅथी डॉक्टर, आयुर्वेदातील वैद्य किंवा होमिओपॅथी डॉक्टर असल्यास त्यांच्याकडून औषधोपचार घेण्यास प्राधान्य द्यावे. याची माहिती न मिळाल्यास जवळच्या डॉक्टरांना दाखवून उपचार चालू करावेत. डॉक्टरांनी सांगितलेल्या आवश्यक चाचण्याही करून घ्याव्यात. डॉक्टरांपासून कोणतीही लक्षणे लपवू नयेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या आरोग्याचा आढावा वेळोवेळी द्यावा. उपचार चालू असूनही रोगाची तीव्रता वाढत असेल, तर आवश्यक वाटल्यास दुसर्या डॉक्टरांचे किंवा वैद्यांचे मत घ्यावे आणि तारतम्याने रुग्णालयात भरती होण्याविषयी निर्णय घ्यावा. स्वतःच्या मनाने, तसेच पुस्तके किंवा सामाजिक माध्यमांतील ‘पोस्ट’ वाचून स्वतःच्या स्तरावर केलेल्या उपचारांवर विसंबून राहू नये. सतर्क राहून उपचार करणे आवश्यक !कोरोनाबाधित ८५ टक्के रुग्ण त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे बरे होतात, तर केवळ १५ टक्के रुग्ण पुढच्या टप्प्यात जातात, असे आतापर्यंतचे सार्वत्रिक निरीक्षण आहे. असे असले, तरी १५ टक्के कोण ? हे आधी कुणीच सांगू शकत नाही. यामुळे या रोगासंदर्भात निष्काळजी न रहाता लवकरात लवकर उपचार चालू करावेत. कोरोनाबाधित व्यक्ती बरे होण्याचे प्रमाण पुष्कळ अधिक असल्याने या रोगाला घाबरू नये; परंतु सतर्क रहावे. जन्म-मृत्यू हे प्रारब्धानुसार असले, तरी जीविताच्या रक्षणासाठी वेळीच योग्य क्रियमाण वापरणे, ही आपली साधना आहे, हे लक्षात घेऊन कृती करावी ! – डॉ. पांडुरंग मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. |