परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली काळानुसार सिद्ध करण्यात आलेला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा तारक आणि मारक जप ऐकल्यावर साधकांना झालेले त्रास अन् आलेल्या अनुभूती

नृत्य आणि संगीत यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

‘काळानुसार श्रीरामाचे तारक आणि मारक तत्त्व अधिकाधिक मिळावे’, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संगीत समन्वयक कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजात श्रीरामाचे जप सिद्ध केले आहेत. या जपामागे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प असल्याने त्यात अधिक चैतन्य जाणवते. ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा तारक आणि मारक जप लहान, मध्यम आणि मोठ्या आवाजात ऐकवल्यावर त्याचा आध्यात्मिक त्रास असलेल्या आणि आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकांवर काय परिणाम होतो ?’, याचा संशोधनात्मक अभ्यास करण्यात आला. या वेळी रामनाथी आश्रमातील त्रास असलेल्या साधकांना जपातील चैतन्य सहन न झाल्याने जाणवलेले त्रास आणि साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.  (भाग २)

२. ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ नामजप (मारक जप)

२ अ. आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना जाणवलेले त्रास

२ अ १. सौ. आकांक्षा

२ अ १ अ. साधकांना त्रास देणार्‍या सूक्ष्मातील वाईट शक्तींनी नामजपाशी लढण्याचा प्रयत्न करणे : ‘प्रयोगाच्या आरंभीपासूनच ‘प्रयोगाला बसायला नको’, असे वाटत होते. मोठ्या आवाजातील मारक नामजप पूर्वीच्या दोन्ही प्रयोगांपेक्षा (लहान आणि मध्यम आवाजातील नामजपापेक्षा) अधिक परिणामकारक असल्यामुळे साधकांना त्रास देणार्‍या सूक्ष्मातील वाईट शक्तींनी त्याच्याशी लढण्याचा प्रयत्न केला. यामुळे वातावरणात पुष्कळ गोंधळाचे वातावरण आणि त्रासदायक स्पंदने निर्माण झाली. साधारण दीड-दोन घंटे वाईट शक्ती सूक्ष्मातून लढत होत्या.

२ अ १ आ. नामजपातील चैतन्य सहन न झाल्याने मला त्रास देणार्‍या वाईट शक्तीची अस्वस्थता वाढली. त्यानंतर त्याने दीड घंटा ध्यान करून निर्गुणातून लढण्याचा प्रयत्न केला.

२ अ १ इ. जप चालू झाल्यावर ‘नामजपरूपी मोठे मोठे दगड वेगाने वाईट शक्तीवर येऊन पडत आहेत’, असे मला वाटले.

२ अ १ ई. बाण सोडणारा राम आठवून बाण सोडावेसे वाटणे; परंतु ‘वाईट शक्ती तसे विचार देऊन त्रासदायक शक्तीचे बाण जपाच्या दिशेने सोडत आहे’, असे जाणवणे : काही वेळाने मला श्रीरामाचे गाणे आठवले. त्या वेळी मला बाण सोडणारा राम आठवत होता आणि मलाही सूक्ष्मातून बाण सोडावेसे वाटत होते. तेव्हा ‘मला त्रास देणारी वाईट शक्ती तसे विचार देऊन त्या माध्यमातून स्वतः सूक्ष्मातून त्रासदायक शक्तीचे बाण जपाच्या दिशेने सोडत आहे’, असे मला जाणवले.’

२ अ २. एक साधिका

२ अ २ अ. ‘श्रीरामाचा जप मनावर अधिक कार्य करणारा जाणवला. राग येणे आणि अन्य विचार न्यून झाले. हा जप शांतीची अनुभूती देणारा जाणवला.’

२ अ ३. श्री. गौरव

२ अ ३ अ. ‘श्रीरामनामाचा मारक जप ऐकताक्षणी मला त्रास देणार्‍या वाईट शक्तीला भीती आणि आश्‍चर्य वाटले.

२ अ ३ आ. साधकांना त्रास देणार्‍या वाईट शक्तींनी जलद आणि आघातयुक्त गाणी म्हणणे; परंतु नंतर शक्ती क्षीण होऊन त्या शांत होणे : जपाला प्रत्युत्तर म्हणून मला आणि अन्य साधकांना त्रास देणार्‍या सूक्ष्मातील वाईट शक्तींनी जलद अन् आघातयुक्त (डी.जे. बीट्सनी) गाणी म्हटली. परिणामी तेव्हा आम्हाला ध्वनीक्षेपकावर मोठ्या आवाजात लावलेला जपही ऐकू येत नव्हता. शेवटी सर्व वाईट शक्तींची शक्ती क्षीण होऊन त्या शांत झाल्या, असे जाणवले.

२ अ ४. सौ. शुभदा

२ अ ४ अ. मोठ्या आवाजातील नामजपाच्या ध्वनीतून विविध रंगांची तेजस्वी वर्तुळे फिरत असल्याचे दिसणे आणि वाईट शक्तींनी गाण्यांच्या माध्यमातून काळपट रंगांची वर्तुळे कार्यरत ठेवणे : ‘मोठ्या आवाजातील नामजपाच्या ध्वनीतून मध्यभागी निळा रंग, बाजूने पिवळा आणि भगवा रंग असलेली तेजस्वी वर्तुळे चित्रीकरण कक्षात वरच्या भागात गोल फिरत होती. मधे मधे ती वर्तुळे नागमोडी फिरत होती. साधकांना त्रास देणार्‍या सूक्ष्मातील वाईट शक्ती प्रयोगाच्या प्रारंभीपासून चित्रपटातील गाणी म्हणत होत्या. आम्ही बसलेल्या कक्षात वाईट शक्ती होत्या, त्या स्तराला राखाडी, काळपट रंगाचे धूसर वर्तुळ दिसत होते. वाईट शक्ती सूक्ष्मातून सतत गाणी म्हणून ते वर्तुळ कार्यरत ठेवत होते, असे जाणवले. ‘वाईट शक्ती गाणी का म्हणतात ?’, ते या अनुभवातून कळाले.

२ अ ४ आ. वाईट शक्तींची शक्ती न्यून होत गेल्याने गाण्यांचा प्रकार आणि स्वर पालटणे : या प्रयोगाच्या प्रारंभी वाईट शक्तींनी गाण्याचा आरंभ मराठी गाण्यांनी केला. त्या वेळी त्यांनी उच्च स्वरातील सर्व गाणी म्हटली. त्यानंतर मधल्या कालावधीत हिंदी चित्रपटातील मध्यम पट्टीतील गाणी म्हटली असे जाणवले. यावरून वाईट शक्तींची शक्ती न्यून होत गेल्याने ‘गाण्यांचा प्रकार आणि स्वर कसा पालटतो ?’, हे पहायला मिळाले.’

२ अ ५. कु. आसावरी

२ अ ५ अ. जप ऐकतांना डोक्यावर चैतन्यशक्ती वेगाने फिरत असल्याचे जाणवणे आणि प्रयोगानंतर हलकेपणा अन् उत्साह वाटणे : ‘माझ्यावर जपाचा परिणाम अधिक प्रमाणात होऊन मला काही सुचेनासे होत होते. आज्ञाचक्राच्या ठिकाणी परिणामकारकता वाढत जाऊन डोक्यावर चैतन्यशक्ती वेगाने फिरत असल्याचे जाणवत होते. सूक्ष्मातील वाईट शक्तीची शक्ती अधिक प्रमाणात उणावल्याचे जाणवत होते. प्रयोगानंतर मला हलके वाटत होते, तसेच उत्साह जाणवत होता.

२ आ. चांगल्या अनुभूती

२ आ १. श्रीमती सुरेखा सरसर

२ आ १ अ. ‘जपामध्ये अद्भुत शक्ती एकवटली आहे आणि आजूबाजूला चैतन्य अन् उत्साह पसरला आहे’, असे वाटणे : ‘प्रयोगाच्या वेळी आमच्या समवेत सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ होते. या दिवशी प्रयोगात ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा जप मारक स्वरूपात मोठ्या आवाजात चालू होता. प्रत्येक ‘जय’ या शब्दावर जोर दिला जात होता. त्यामुळे ‘जपामध्ये कोणती तरी अद्भुत शक्ती एकवटली आहे’, असे जाणवत होते. ‘आजूबाजूला चैतन्य आणि उत्साह पसरला आहे’, असे वाटत होते.

२ आ १ आ. ‘वानर डोक्यावर ‘श्रीराम’ लिहिलेले दगड घेऊन ‘जय श्रीराम’, अशी मोठ्या आवाजात गर्जना करत सेतू बांधत आहेत’, असे दृश्य दिसणे : डोळ्यांसमोर श्रीरामाची वानरसेना सेतू बांधतांना दिसत होती. ‘वानर डोक्यावर ‘श्रीराम’ लिहिलेले मोठे मोठे दगड घेऊन ‘जय श्रीराम’, ‘जय श्रीराम ।’, अशी मोठ्या आवाजात गर्जना करत पुढे पुढे सरकत आहेत आणि त्यांच्या पाठीमागे प्रभु श्रीराम अन् लक्ष्मण जात आहेत’, असे दृश्य दिसले.’

२ आ २. श्री. मनोज कुवेलकर

२ आ २ अ. आज्ञाचक्रावर संवेदना जाणवून ध्यान लागणे : ‘श्रीरामाचा मारक जप ऐकल्यावर आज्ञाचक्रावर संवेदना जाणवायला लागल्या आणि ‘आज्ञाचक्रावर गोलाकारात काहीतरी फिरत आहे’, असे जाणवायला लागले; पण ‘ते काय आहे ?’, हे कळत नव्हते. त्यानंतर हळूहळू माझे ध्यान लागायला लागले. मधे मधे माझे ध्यान लागत होते आणि मनाची स्थिती निर्विचार होती.’

२ आ ३. सौ. अवनी आळशी

२ आ ३ अ. जप ऐकल्यावर वीरश्री जागृत होणे आणि ‘जप हा रामबाण असून तो लक्ष्यापर्यंत पोचत आहे’, असे जाणवणे : ‘जप ऐकल्यावर आरंभी मनात वीरश्री जागृत झाली. साधकांनी रामाचा जयघोष केला. तेव्हा रामाविषयी मनात भाव वाटत होता.

‘हा नामजप नसून रामबाण आहेत आणि ते लक्ष्यापर्यंत वेगाने जात आहेत’, असे दिसले. त्या वेळी मला दिसले, ‘श्रीराम’ म्हणजे बाण धनुष्याला लावणे, ‘जय राम’ म्हणजे बाण लक्ष्यावर केंद्रित करणे आणि ‘जय जय राम’ म्हणजे शत्रू गतप्राण होऊन भूमीवर कोसळणे.’

२ आ ४. होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी

२ आ ४ अ. जपामुळे सहस्रार ते मूलाधार चक्रापर्यंतची त्रासदायक शक्ती बाहेर खेचली जाणे : ‘जपाचा परिणाम माझ्या सहस्राराच्या ठिकाणी झाल्याचे जाणवले. ‘जपातून एक प्रवाह वेगाने सहस्रारचक्रातून थेट मूलाधारचक्रापर्यंत जाऊन तेथील त्रासदायक शक्ती खेचून बाहेर काढत आहे’, असे मला जाणवले.’

२ आ ५. कु. मयुरी डगवार

२ आ ५ अ. जप ऐकतांना वैशिष्ट्यपूर्ण नाद ऐकू येणे आणि तो अनाहत नाद असल्याचे प.पू. देवबाबा यांनी सांगणे : ‘श्रीरामाचा जप आणि ‘ॐ’कार हे दोन्ही जप ऐकतांना मला एक वैशिष्ट्यपूर्ण नाद ऐकायला आला. याविषयी प.पू. देवबाबा यांना सांगितल्यावर त्यांनी ‘हा अनाहत नाद आहे’, असे सांगितले.

२ आ ५ आ. ‘कु. तेजल पात्रीकर यांचा भाव आणि तळमळ यामुळे जपाची परिणामकारकता वाढली’, असे जाणवले.’

२ आ ६. श्री. प्रताप कापडिया

२ आ ६ अ. कपाळावर स्पंदने जाणवणे आणि ‘प्रत्येक जपाबरोबर कुणीतरी कपाळावर पेन्सिलने उभ्या रेषा मारत आहे’, असे जाणवणे : ‘या जपाच्या वेळी ‘कपाळावर (शिवाचे गंध असते, तेवढ्याच कपाळावरील भागावर स्पंदने जाणवली. पूर्ण कपाळावर जाणवली नाहीत.) कुणीतरी पेन्सिलने उभ्या रेषा मारत आहे,’ असे जाणवत होते. त्या रेषांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक रेषेबरोबर श्रीरामाचा नामजप होत होता, म्हणजे ‘श्रीराम’ म्हटल्यावर एक रेष, ‘जय राम’ म्हटल्यावर दुसरी रेष, ‘जय जय’ म्हटल्यावर तिसरी रेष आणि ‘राम’ म्हटल्यावर चौथी रेष, याप्रमाणे स्पंदने जाणवत होती. मी कान बंद करून जेव्हा नामजप ऐकत होतो, तेव्हा ही स्पंदने निघून जात होती आणि कान बंद न करता डोळे उघडे ठेवून नामजप ऐकला, तर स्पंदने न्यून होत होती. दोन दिवसांच्या सर्व प्रयोगात केवळ कपाळावरच अधिक स्पंदने जाणवत होती.’

२ आ ७. श्री. प्रकाश मराठे

अ. ‘श्रीरामाच्या मध्यम आवाजातील मारक नामजपाचा प्रयोग चालू झाल्यावर अनाहत, तसेच आज्ञाचक्रावर बर्‍याच प्रमाणात शक्ती जाणवली.

आ. ‘मोठा आपत्काळ समोर येत असून लोक श्रीरामाला आकांताने हाक मारत आहेत आणि श्रीराम धनुष्याची प्रत्यंचा ताणून रक्षणाकरता उभा आहे’, असे जाणवले.’

(‘देवतांच्या मारक स्वरूपाच्या जपाविषयी मार्गदर्शन करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले काही वर्षांपूर्वी मला म्हणाले होते, ‘‘ज्या वेळी तीव्र आपत्काळ असेल, तेव्हा लोकांना ‘त्राही त्राही’ होईल आणि लोक आर्ततेने मारकभावातच देवतांना हाका मारतील. त्या वेळी संकटात भावपूर्ण जप आठवत नाही.’’ – कु. तेजल पात्रीकर)                                  (समाप्त)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते, याची चाचणी करतात. याला सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग म्हणतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक