संयुक्त उत्तरेश्‍वर शुक्रवार पेठ शिवसेनेच्या वतीने नागरिकांना पाणी आणि बिस्कीट यांचे वाटप !

पहाटे ४.३० पासून लस घेण्यासाठी नागरिक रांगेत !

प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार !

नागरिकांना पाणी आणि बिस्कीट वाटप करतांना शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे आणि अन्य

कोल्हापूर, २७ एप्रिल – पंचगंगा रुग्णालय लसीकरण केंद्रावर २६ एप्रिल या दिवशी पहाटे ४.३० वाजल्यापासून लस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. यात ज्येष्ठ नागरिक, अपंग, महिला यांचा समावेश होता. (प्रारंभीपासून प्रशासनाने योग्य प्रकारे नियोजन करून पुरेसी लस उपलब्ध करून दिली असती, तर नागरिकांना लस घेण्यासाठी पहाटे ४.३० पासून रांगा लावण्याची वेळ आली नसती. किमान यापुढील काळात तरी प्रशासनाने नागरिकांना इतक्या पहाटे यावे लागू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात ! – संपादक)

इतक्या पहाटे आल्याने अनेक नागरिकांनी अल्पाहारही केला नव्हता. याची नोंद घेत संयुक्त उत्तरेश्‍वर शुक्रवार पेठ शिवसेनेच्या वतीने श्री. किशोर घाटगे, श्री. संजय देसाई, श्री. सुरेश कदम आणि त्यांचे सहकारी यांनी पुढाकार घेत या नागरिकांना पाण्याच्या बाटल्या, बिस्कीट पुडे देऊन त्यांना आधार दिला. या वेळी गर्दी टाळण्यासाठी शिवसैनिकांनी योग्य प्रकारे रांगा लावणे, ज्येष्ठांना आधार देणे यांसारख्याही कृती केल्या.