ढेबेवाडी (जिल्हा सातारा) येथे विनाकारण फिरणार्‍या नागरिकांची जागेवरच कोरोना चाचणी

सातारा – पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथे कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी पोलीस आणि आरोग्य विभाग यांच्या वतीने संयुक्त मोहीम राबवण्यात आली. रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍या नागरिकांची जागेवरच कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये ६० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यातील ४ जणांचे अहवाल कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आले. बाधितांना तात्काळ ‘कोरोना केअर सेंटर’मध्ये पाठवण्यात आले आहे.

ढेबेवाडी बाजारपेठेतील व्यापारी अन् ग्राहकांनी जनता कर्फ्युला चांगला प्रतिसाद दिला; मात्र आजूबाजूच्या गावातून विनाकारण फिरणार्‍यांची संख्या अल्प होत नव्हती. यावर ढेबेवाडी पोलीस आणि आरोग्य विभागाने बसस्थानक परिसरात विनाकारण फिरणार्‍यांची जागेवरच कोरोना चाचणी करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे आता विनाकारण घराबाहेर फिरणार्‍या नागरिकांवर चांगलाच अंकूश लागला आहे.