संभाजीनगर – कोरोनाच्या रुग्णांना जीवदान देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा ऑक्सिजन हवेतून निर्माण करणारे प्रकल्प शहरातील ४ रुग्णालयांनी उभे केले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची नोंद घेतली. त्यामुळे उत्साह वाढलेल्या जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी एक आराखडा सिद्ध केला आहे. त्यानुसार येत्या १ ते ३ मासांत शहर, जिल्ह्यात ९ सरकारी, ८ खासगी रुग्णालयांत हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे १७ प्रकल्प उभे रहातील. त्यापैकी ३ सर्वाधिक रुग्णभार असलेल्या घाटी रुग्णालयात असतील.
शहराला सध्या प्रतिदिन ६२, तर मराठवाड्याला १८० मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे; मात्र तेवढा ऑक्सिजन पुणे, नागपूर, रायगड येथून उपलब्ध करणे जिकिरीचे होत आहे. यासाठी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ठरवले. सर्व मोठ्या रुग्णालयांशी चर्चा करून जिल्ह्याचा आराखडा चव्हाण यांनी अंतिम केला आहे.