रेमडेसिविर, ऑक्सिजन, एच्.आर्.सी.टी. टेस्ट यांविषयी संभ्रम दूर होणे आवश्यक ! – डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली


सांगली, २३ एप्रिल – कोरोना महामारी दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. या काळात रेमडेसिविर, ऑक्सिजन, एच्.आर्.सी.टी. टेस्ट यांविषयी लोकांच्या मनातील संभ्रम दूर होणे आवश्यक असून महामारीच्या या काळात उपलब्ध साधनसामग्रीचा उत्तरदायीपणे आणि जपून आवश्यकतेनुसार वापर होणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

कोरोना उपचार पद्धतीविषयी लोकांच्या मनात असलेले अपसमज दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी २२ एप्रिल या दिवशी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. या वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, डॉ. अविनाश झळके, डॉ. अमृता दाते, डॉ. परमशेट्टी यांसह अन्य डॉक्टर उपस्थित होते.

रेमडेसिविर देण्याविषयीचा निर्णय उपचार करणार्‍या डॉक्टरांना घेऊ द्या ! – डॉ. सोमनाथ मगदूम


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथील साहाय्यक प्राध्यापक डॉ. सोमनाथ मगदूम आणि क्रांती कार्डिक सेंटर येथील डॉ. अविनाश झळके म्हणाले, कोरोनाच्या उपचार पद्धतीविषयी संशोधन चालू आहे. प्राथमिक संशोधनाअंती काही औषधे थोड्याफार प्रमाणात लागू झाल्याचे दिसून येत आहे. यात सामान्य व्यक्तीला माहिती असणारे रेमडेसिविर हे औषध आहे. हे औषध दिले म्हणजे रुग्णाचा निश्‍चितपणे प्राण वाचेल, असा अपसमज पसरल्याने प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णाला हे औषध दिले जावे, असा नातेवाइकांचा आग्रह असतो. तथापि हे औषध आयुष्य वाचवणारे औषध नाही. या औषधाची रुग्णाला अत्यावश्यकता आहे कि नाही ते उपचार करणार्‍या डॉक्टरांना ठरवू द्या.
नातेवाइकांनी स्वत:हून हे औषध रुग्णाला द्यावे याविषयी डॉक्टरांवर दबाव टाकू नये. रेमडेसिविर हे औषध विषाणू मारत नसून केवळ विषाणूंचे रिप्लीकेशन थांबवण्यामध्ये याचा काही प्रमाणात लाभ होत आहे. आजाराच्या पहिल्या ९ दिवसात या औषधाचा वापर झाल्यास लाभ फायदा होतो. आजाराच्या १० व्या दिवसानंतर या औषधाचा वापर झाल्यास त्याची उपयुक्तता अत्यंत अल्प आहे.

रेमडेसिविरच्या दुष्परिणामाविषयी बोलतांना डॉ. अविनाश झळके म्हणाले, रेमडेसिविर औषधाचा दुष्परिणाम हायपरसेंसेटीव्हीटी, किडनीवर ताण येणे, यकृताला सूज येणे अशा गोष्टी १० दिवसांत आढळू शकतात.

आवश्यकता नसतांना सरसकटपणे एच्.आर्.सी.टी. टेस्ट करू नका ! – डॉ. आनंद मालाणी

या संदर्भात डॉ. आनंद मालाणी म्हणाले, एच्.आर्.सी.टी. टेस्ट कोरोना महामारीच्या काळात बेसुमारपणे करण्यात आली. प्रत्येक कोरोना रुग्णाला एच्.आर्.सी.टी. टेस्टची आवश्यकता नसते. जे रुग्ण घरी विलगीकरणात आहेत त्यांना एच्.आर्.सी.टी. टेस्टची आवश्यकता नसते. रुग्णांनी स्वत:हून जाऊन सी.टी.स्कॅन करून घेणे चुकीचे आहे. पहिल्या ७ दिवसांमध्ये स्कॅनिंग केल्यास त्याचा फारसा उपयोग होत नाही. एच्.आर्.सी.टी. टेस्टचा निर्णय रुग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांना घेऊ द्या.

सेवासदनच्या डॉ. अमृता दाते गृह विलगीकरणाविषयी म्हणाल्या, घरी बर्‍या होऊ शकणार्‍या रुग्णांनी रुग्णालयातील खाटा अडवू नयेत. कोरोनाच्या आजारात ९० टक्के रुग्ण कोणत्याही गुंतागुंतीशिवाय बरे होऊ शकतात. १० टक्के रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता पडते. पॅनिक अल्प करणे ही या महामारीच्या काळात मोठी आवश्यकता निर्माण झाली आहे. व्यवस्थितरित्या स्वत:वर निर्बंध घालून घेतले, ताप, सर्दी, खोकला आदि संबंधित लक्षणे जाणवल्याबरोबर डॉक्टरांकडे जाऊन उपचार चालू केले, तर आपण घरीच बरे होऊ शकतो.