कोविड रुग्‍णालयांसाठी ५ सहस्र ९०० रेमडेसिविर इंजेक्‍शनचा साठा उपलब्‍ध !

पुणे – जिल्‍हा प्रशासनाकडून कोविड रुग्‍णालयांसाठी ५ सहस्र ९०० रेमडेसिविर इंजेक्‍शनचा साठा उपलब्‍ध करून दिला आहे. त्‍यामुळे या इंजेक्‍शनसाठी धावाधाव करणार्‍या रुग्‍णांचे नातेवाइक आणि रुग्‍णालय यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पहिल्‍या टप्‍प्‍यात १८४ कोविड रुग्‍णालयांना खाटांच्‍या क्षमतेच्‍या तुलनेत ७० टक्‍के रेमडेसिविर देण्‍यात आले, तर उर्वरित ३२७ कोविड रुग्‍णालयांना खाटांच्‍या तुलनेत ४० टक्‍के रेमडेसिविर उपलब्‍ध करुन देण्‍यात आले.

महापालिका आणि साहाय्‍यक आयुक्‍त अन्‍न अन् औषध प्रशासन यांनी औषधांचे वितरण दिलेल्‍या संख्‍येनुसार होत असल्‍याची निश्‍चिती करावी. यामध्‍ये काही अनियमितता आढळल्‍यास संबंधितांवर कारवाई करण्‍याचे आदेश जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. कोविड रुग्‍णालय नसलेल्‍या रुग्‍णालयांनाही आवश्‍यकता भासल्‍यास संबंधित महापालिका, तालुका किंवा जिल्‍हा रुग्‍णालयाच्‍या आरोग्‍य अधिकार्‍याकडून कोविड रुग्‍णालय म्‍हणून नोंद करून पत्र घेतल्‍यास त्‍यांनाही रेमडेसिविर उपलब्‍ध करून देण्‍यात येईल, असे आवाहन अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी केले आहे.