सिंधुदुर्गात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असून दिवसभरात कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू झाला असून १५२ नवीन रुग्ण आढळले आहेत.
इतर सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.
मृत्यू झालेले एकूण रुग्ण २२१
उपचार चालू असलेले रुग्ण २ सहस्र ४९९
आतापर्यंतचे एकूण रुग्ण १० सहस्र ५९
चिंताजनक प्रकृती असलेले रुग्ण ९७
भाजपचे माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना कोरोनाचा संसर्ग
भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांचा कोरोना तपासणी अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आला आहे. याची माहिती त्यांनी स्वतः सामाजिक माध्यमातून दिली असून संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी, तसेच स्वत:ची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.
|
कणकवली – कोकण रेल्वेने येणार्या प्रवाशांची कणकवली स्थानकावर रॅपिड टेस्ट करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथे भेट देऊन पहाणी केली अन् माहिती घेतली, तसेच रेल्वे गाडी आल्यानंतर कशा प्रकारे टेस्ट केली जाते याचीही पहाणी केली. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
वेंगुर्ले शहरात आजपासून जनता कर्फ्यू !
वेंगुर्ले – वाढत्या कोरोना संसर्गामुळे शहरात २० एप्रिल ते १ मे या कालावधीत कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत. सकाळी ७.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा चालू रहातील. त्यानंतर अत्यावश्यक सेवांसहित सर्व आस्थापने बंद रहातील, अशी माहिती मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे यांनी दिली.
सावंतवाडी तालुक्याच्या कोविड केअर सेंटरचे भोसले पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये स्थलांतर
सावंतवाडी – सावंतवाडी तालुक्याचे कोविड केअर सेंटर अखेर चराठा, ओझरवाडी येथील भोसले पॉलिटेक्निक कॉलेज येथे १९ एप्रिल या दिवशी स्थलांतरित करण्यात आले. ‘गेले काही दिवस सावंतवाडी नगरपालिकेच्या हेल्थ फार्म येथे हे सेंटर चालू होते; परंतु तेथे केवळ १० रुग्णांची सोय होती. आता जवळपास शंभर रुग्णांची सोय होईल’, असे भोसले पॉलिटेक्निक कॉलेज प्रशासनाकडून सांगण्यात आले.
खारेपाटण बाजारपेठ ८ दिवस पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय
कणकवली – कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी खारेपाटण बाजारपेठ २२ ते २९ एप्रिल हे ८ दिवस कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय येथील ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या स्थानिक ग्राम सनियंत्रण समिती आणि व्यापारी यांच्या बैठकीत घेण्यात आला.
वैभववाडी कोविड केअर सेंटरची क्षमात वाढणार
वैभववाडी – तालुक्यात सद्य:स्थितीत उपचार चालू असलेल्या रुग्णांची संख्या २२६ इतकी आहे. तालुक्यातील कोविड केअर सेंटरची १०४ खाटांची क्षमता आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी आणखी ५० खाटा या सेंटरला देणार असल्याची माहिती भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी दिली.
पडवे येथील रुग्णालयात १०० खाटांची सुविधा
कणकवली – कोरोनाबाधितांमध्ये वाढ होत असल्याने त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत आणि त्यांना चांगली सुविधा मिळावी, यासाठी माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी त्यांच्या कुडाळ तालुक्यातील पडवे येथील रुग्णालयात यापूर्वी ५० खाटांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता आणखी ५० खाटांची सुविधा उपलब्ध करून दिल्याने या कोविड केंद्राची क्षमता १०० खाटांची झाली आहे.
बांदा येथे रॅपिड टेस्टमध्ये शिक्षक कोरोनाबाधित झाल्याचे उघड
बांदा – शहरात १९ एप्रिल या दिवशी सकाळी करण्यात आलेल्या १० जणांच्या अँटिजेन रॅपिड चाचणीत तिघे जण कोरोनाबाधित असल्याचे उघड झाले. त्यात एका शिक्षकाचा समावेश आहे. शहरात विनाकारण फिरणार्यांवर कारवाईचा बडगा उभारण्यात येत असून अनावश्यक फिरणार्यांची रॅपिड टेस्ट करण्यात येत आहे. शहरात कोरोनाचा रुग्ण सापडल्याने मंगळवार, २० एप्रिल या दिवशी अत्यावश्यक सेवांसह संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे.