कोरोनासारख्या महामारीच्या काळात रेमडेसिविर सारखे रुग्णांना संजीवनी असणारे इंजेक्शन चढ्या दराने विक्री करणे हे असंवेदनशीलतेची परिसीमा गाठल्याचे उदाहरण आहे. अशांना त्वरित कठोर शिक्षा केल्यास असे प्रकार थांबतील.
संभाजीनगर – येथील शासकीय रुग्णालयातून कोरोनावरील ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनची चोरी करून त्याची विक्री करणार्या तिघांना शहरातील पुंडलिकनगर पोलिसांनी सापळा रचून १६ एप्रिल या दिवशी अटक केली. घाटी रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी अनिल बोहते आणि मेडिकल दुकानदार मंदार भालेराव अन् अभिजीत तौर अशी आरोपींची नावे आहेत. हे तिघेही विनाप्रिस्क्रिप्शन आणि विनापावतीचे ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनची चढ्या भावाने विक्री करत होते. यावरून ‘रेमडेसिविर’ विक्रीच्या काळा बाजाराचे ‘रॅकेट’ कार्यरत असण्याची शक्यता आहे. वरील आरोपी ‘रेमडेसिविर’चे १ इंजेक्शन १५ सहस्र रुपयांना विकत होते.