सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर खारेपाटण येथे आरोग्य पथक सज्ज

 सिंधुदुर्ग – जिल्ह्याच्या सीमेवर मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण येथील पोलीस तपासणी नाक्यावर आरोग्य पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. या मार्गावरून जाणारे-येणारे प्रवासी आणि वाहनचालक यांची प्राथमिक तपासणी येथे केली जात आहे. खारेपाटणपासून जवळच असलेल्या दिगशी (तालुका वैभववाडी) गावात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडले आहेत. त्यामुळे या भागातून येणार्‍या नागरिकांविषयी सतर्कता बाळगली जात आहे.

सिंधुदुर्गात कोरोनाचे ३२५ नवीन रुग्ण : ५ जणांचा मृत्यू

मृत्यू झालेले एकूण रुग्ण २१०

उपचार चालू असलेले रुग्ण २ सहस्र २५१

बरे झालेले एकूण रुग्ण ७ सहस्र ९९

आतापर्यंतचे एकूण रुग्ण ९ सहस्र ५६६

चिंताजनक प्रकृती असलेले रुग्ण ७६

  • कणकवलीत अनावश्यक फिरणार्‍या एकाला कोरोनाचा संसर्ग

  • सिंधुदुर्गात अनावश्यक फिरणार्‍यांची रॅपिड टेस्ट करण्यास प्रारंभ

कणकवली – तालुक्यात संचारबंदीची कडक कार्यवाही केली जात असून शहरातील पटवर्धन चौकात आता आरोग्य विभाग, पोलीस आणि नगरपंचायत प्रशासन यांच्या वतीने अनावश्यक फिरणार्‍यांची ‘रॅपिड टेस्ट’ केली जात आहे.

१७ एप्रिलला केलेल्या या टेस्टमध्ये एका स्थानिक व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.

संचारबंदीच्या कालावधीत मास्क न लावता आणि अनावश्यक फिरत असलेल्या लोकांची ‘ऑक्सिजन लेवल’ आणि शरिराचे तापमान तपासून कोरोनाची लक्षणे आढळल्यास लगेच ‘रॅपिड टेस्ट’ केली जात आहे.

कुडाळ शहरातही अनावश्यक फिरणार्‍यांची रॅपिड टेस्ट करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. १७ एप्रिल या दिवशी ६० जणांची तपासणी करण्यात आली.