राज्यात ‘प्लाझ्मा दान’ मोहिमेला अल्प प्रतिसाद

पणजी – राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असला, तरी त्या तुलनेत ‘प्लाझ्मा दान’ मोहिमेला अल्प प्रतिसाद लाभत आहे. शासनाने आवाहन करून कोरोनाचा संसर्ग झालेले आणि नंतर कोरोनापासून बर्‍या झालेल्या व्यक्ती ‘प्लाझ्मा दान’ करण्यास पुढे सरसावत नाहीत. राज्यातून प्रतिदिन केवळ १ किंवा २ व्यक्तीच ‘प्लाझ्मा दान’ करण्यास पुढे येत आहेत.

रुग्णालय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनापासून बरे झालेल्यांना ‘प्लाझ्मा दान’ करण्याची विनंती करण्यात येत आहे. ‘प्लाझ्मा दान’ हे ऐच्छिक आहे. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने ‘प्लाझ्मा’ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सामाजिक माध्यमातून ‘प्लाझ्मा’ची मागणी वारंवार करण्यात येत आहे. राज्यात गतवर्षी कोरोनाची पहिली लाट आली, तेव्हा प्रारंभी ‘प्लाझ्मा दान’ मोहिमेला अल्प प्रतिसाद लाभला होता; मात्र शासनाने ‘प्लाझ्मा दान’ करणार्‍याला विनामूल्य वैद्यकीय चाचणी आणि उपचार देणार असल्याचे घोषित केल्यानंतर या मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभला होता.