वाढत्या मागणीमुळे राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा

 पणजी – देशातील इतर भागांप्रमाणे गोव्यातही रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासू लागला आहे. कोरोनाबाधित रुग्णावरील उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर होत असतो.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा राज्याला पुरवठा करणार्‍या संस्थेच्या मते देशभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत असल्याने देशभरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणार्‍या प्रत्येकाला इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. गोव्यात पुढील काही दिवसांत रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होणार आहे. गोव्यातील ‘केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन’चे अध्यक्ष अल्बर्ट डिसा म्हणाले, ‘‘गोव्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा थोडाच साठा उपलब्ध आहे; मात्र मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.’’ गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. बांदेकर म्हणाले, ‘‘रेमडेसिवीर इंजेक्शन गोव्यात सध्या साठ्यामध्ये उपलब्ध आहे, तसेच इंजेक्शनचे वितरण करणार्‍याला इंजेक्शनचे १० सहस्र ‘वायल’ अतिरिक्त साठ्यामध्ये ठेवण्यास सांगितले आहे.’’