दिवसभरात ९२७ कोरोनाबाधित,तर ६ जणांचा मृत्यू

गोव्यात कोरोनाच्या हाहाःकाराचा दुसरा दिवस

पणजी, १६ एप्रिल (वार्ता.) – गोव्यात १६ एप्रिल या दिवशी कोरोनाविषयक एकूण ३ सहस्र १८९ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ९२७ नवीन रुग्ण सापडले. दिवसभरात २८२ रुग्ण कोरोनापासून बरे झाले, तर प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६ सहस्र ३२१ झाली आहे. चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण सापडण्याची टक्केवारी २९.०७ झाली आहे. एकाच दिवशी कोरोनाबाधित ९२७ नवीन रुग्ण सापडल्याने गोव्यासाठी हा एक नवीन उच्चांक स्थापित झाला आहे.

अधिक प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण असलेली केंद्रवार सूची पुढीलप्रमाणे आहे. मडगाव ७२५, पर्वरी ५८९, म्हापसा ४२६, फोंडा ४१७, कांदोळी ४१६, पणजी ४१४, वास्को ३७०, कुठ्ठाळी ३४५आणि चिंबल २२८ मागील २४ घंट्यांत ६ रुग्णांचे निधन झाले. कोरोनामुळे मृत्यू आलेल्यांची एकूण संख्या ८६८ वर पोेचली आहे. विशेष म्हणजे निधन पावलेल्या ६ रुग्णांपैकी ४ रुग्ण हे ४४ ते ५१ वर्षे या वयोगटातील आहेत. निधन पावलेल्या ६ रुग्णांपैकी २ रुग्णांचे रुग्णालयात भरती केल्यानंतर ६ घंट्यांच्या आत निधन झाले, तर एका रुग्णाचे घरी अलगीकरणात असतांना उपचार घेत असतांना निधन झाले. (याला उत्तरदायी कोण ? त्याला घरी अलगीकरणात ठेवण्याचा निर्णय कशाच्या आधारे घेतला ? हे स्पष्ट होईल का ? – संपादक)