‘पर्यटनस्थळ असलेल्या गोव्यात दळणवळण बंदी नको’, या गोवा शासनाच्या भूमिकेला केंद्राचा पाठिंबा ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

डॉ. प्रमोद सावंत

पणजी, १४ एप्रिल (वार्ता.) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला संपर्क साधून गोवा राज्यातील कोरोनाच्या संसर्गाविषयी माहिती जाणून घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यात कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या स्वरूपात राबवणे, तसेच नागरिकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देणे, यांवर भर देण्यास सांगितले आहे, तसेच पर्यटनस्थळ असलेल्या गोव्यात दळणवळण बंदी लादायला नको, या गोवा शासनाच्या भूमिकेला त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘गोव्यात सद्यःस्थितीत दळणवळण बंदी लादलेली नसल्याच्या शासनाच्या भूमिकेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली. गोवा राज्य आकाराने लहान असल्याने या ठिकाणी कोरोना लसीकरण मोहीम चांगल्या प्रकारे राबवता येते. दळणवळण बंदी लादल्यास राज्यातील आर्थिक व्यवहार पुन्हा ठप्प होणार. यामुळे लोकांवर पुन्हा उपासमारीची पाळी येईल. राज्यात पुन्हा दळणवळण बंदी किंवा रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार नाही. गोव्यात पर्यटक मोठ्या संख्यने येत आहेत; मात्र राज्यातील जनतेने त्यांच्या संपर्कात येण्याची आवश्यकता नाही. नागरिकांनी निर्बंधांचे काटेकोरपणे पालन केल्यास आम्ही कोरोनाला हरवू शकू. पर्यटन क्षेत्रात काम करणार्‍या आणि ज४५ वर्षांहून अल्प वय असलेल्यांचे कोरोना लसीकरण करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे.’’