पणजी – राज्यात १४ एप्रिल या दिवशी २४ घंट्यांत ४० वर्षांखालील दोन रुग्णांसह एकूण चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामधील दोघा रुग्णांना मृतावस्थेतच रुग्णालयात आणले गेले, तर एका रुग्णाचे रुग्णालयात भरती केल्यानंतर ११ घंट्यांनी निधन झाले. निधन झालेल्यांमध्ये पेडणे येथील २४ वर्षांचा तरुण, वास्को येथील ६२ वर्षीय महिला, बार्देश येथील ३८ वर्षीय महिला आणि डिचोली येथील ७० वर्षीय वृद्ध यांचा समावेश आहे.
४७३ नवीन रुग्णांसह ५ सहस्र कोरोनाबाधितांचा टप्पा पार
पणजी – राज्यात १४ एप्रिल या दिवशी कोरोनाविषयक २ सहस्र २३६ चाचण्या करण्यात आल्या. यांपैकी कोरोनाबाधित ४७३ नवीन रुग्ण सापडले आहेत. चाचणीच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण २१.१५ टक्के आहे. दिवसभरात २३६ रुग्ण बरे झाले आहेत. प्रत्यक्ष उपचार चालू असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ५ सहस्र ११२ झाली आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मडगाव कोविड केंद्रात ६०० च्या जवळ पोचले आहेत. त्यापाठोपाठ पर्वरी ४८४, फोंडा ३८७, पणजी ३२२ रुग्ण, म्हापसा ३४१, कांदोळी ३४४, कुठ्ठाळी २६५ आणि वास्को २३९, असे रुग्ण आहेत. कोरोनाबाधित प्रवाशांमध्ये आणखी ७ जणांची भर पडली असून एकूण २५ प्रवासी कोरोनाबाधित आहेत.
‘टिका उत्सवा’च्या पाचव्या दिवशी १० सहस्रांहून अधिक लोकांनी घेतली कोरोनाची लस
पणजी – राज्यात कोरोना लसीकरणाच्या अंतर्गत चालू असलेल्या ‘टिका उत्सवा’च्या १४ एप्रिल या पाचव्या दिवशी एकूण १० सहस्र १०६ लोकांनी कोरोनाची लस घेतली. राज्यात कोरोना लसीकरणाला १६ जानेवारी या दिवशी प्रारंभ झाला, तर आतापर्यंत राज्यातील सुमारे २ लाख लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. यामध्ये कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या ४० सहस्र आहे, तर उर्वरितांनी कोरोना लसीचा एकच डोस घेतला आहे.
‘टिका उत्सवा’चा वापर मतदारांना प्रभावित करण्यासाठी केल्यास ‘टिका उत्सव’ रहित करणार ! – राज्य निवडणूक आयोग
पणजी – ‘टिका उत्सवा’अंतर्गत चालू असलेल्या कोरोना लसीकरणाचा एखादा राजकीय पक्ष मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी वापरत करत असेल, तर तात्काळ ‘लसीकरण उत्सव’ रहित करण्यात येणार असल्याची चेतावणी राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. राज्याच्या आरोग्य खात्याने प्रारंभी ११ ते १४ एप्रिल या कालावधीसाठी कोरोना लसीकरणांतर्गत ‘टिका उत्सवा’चे आयोजन केले होते आणि आता हा ‘टिका उत्सव’ २१ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने राबवल्या जाणार्या या उत्सवाचा कुणीही राजकीय लाभ उठवू नये. असा कुठे प्रयत्न झाल्यास त्याविषयी जिल्हाधिकारी किंवा संबंधित अधिकारी यांनी माहिती द्यावी, अशी सूचना राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. विरोधी गटाने ‘टिका उत्सवा’चा राजकीय लाभ उठवला जात असल्याची तक्रार केली होती आणि या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने ही चेतावणी दिली आहे.