अमली पदार्थ व्यवसाय दक्षिण गोव्यापेक्षा उत्तर गोव्यात अधिक कळंगुट, हणजूण आणि पेडणे पोलीस ठाण्यांमध्ये सर्वाधिक प्रकरणे नोंद

पणजी, १४ एप्रिल (वार्ता.) – अमली पदार्थ व्यावसायिक व्यवसायासाठी दक्षिण गोव्याऐवजी उत्तर गोव्याला अधिक पसंती देतात, तसेच अमली पदार्थाचे सेवन करणारे हे केवळ पर्यटकच नव्हे, तर स्थानिक नागरिकही आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी गतवर्षी अमली पदार्थाशी संबंधित दक्षिण गोव्यात ३८, तर उत्तर गोव्यात ६५ गुन्हे नोंद केले आहेत. त्याचप्रमाणे गुन्हे अन्वेषण विभाग आणि अमली पदार्थविरोधी पथक यांनीही दक्षिण गोव्यात १६, तर उत्तर गोव्यात २६ गुन्हे नोंद केले आहेत. चालू वर्षी मार्च अखेरपर्यंत अमली पदार्थाच्या विरोधात उत्तर गोव्यात २०, तर दक्षिण गोव्यात ५ गुन्हे नोंद झाले आहेत. उत्तर गोव्यात सर्वाधिक गुन्हे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या कळंगुट, हणजूण आणि पेडणे पोलीस ठाण्यांमध्ये नोंद झालेले आहेत. या क्षेत्रात अमली पदार्थ व्यावसायिकांसाठी कार्यक्षेत्र ठरलेले असते आणि त्या ठिकाणी ते हा अमली पदार्थ व्यवसाय करतात. हा व्यवसाय मुख्यत्वे रात्रीच्या वेळी चालतो. अमली पदार्थ व्यावसायिक अत्यंत सावधगिरी बाळगून हा व्यवसाय करत असतात; मात्र पेालिसांचे स्थानिक संपर्क आणि तंत्रज्ञानाचा वापर यांमुळे अमली पदार्थ व्यावसायिकांना पोलीस शोधून काढू शकत आहेत.