दोन दिवसांच्या दळणवळण बंदीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी

कणकवली – शासनाने शनिवार आणि रविवार, असे दोन दिवस पूर्णत: दळणवळण बंदी घोषित केली होती. त्याला सिंधुदुर्गवासियांनी उत्तम प्रतिसाद दिला; मात्र सोमवार, १२ एप्रिल या दिवशी पुन्हा जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी बाजारपेठा चालू झाल्याने नागरिकांची गर्दी दिसली.

शासनाने शनिवार आणि रविवार हे दोन दिवस पूर्णत: दळणवळण बंदी घोषित करून सोमवार ते शुक्रवार हे दिवस अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यास अनुमती दिली होती; मात्र शासनाच्या या निर्णयाला व्यापार्‍यांनी विरोध दर्शवला होता. या पार्श्‍वभूमीवर सोमवार, १२ एप्रिलपासून सर्व प्रकारचे व्यवसाय चालू रहातील, अशी भूमिका व्यापारी संघाने घेतली. त्यानुसार जिल्ह्यात आगामी काळात पुन्हा दळणवळण बंदी घोषित होण्याच्या शक्यतेने जनतेने खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली.