दिवसभरात कोरोनाबाधित ४७६ नवीन रुग्ण
पणजी, १२ एप्रिल (वार्ता.) – राज्यात १२ एप्रिल या दिवशी कोरोनाविषयक २ सहस्र २८० चाचण्या करण्यात आल्या. यांपैकी कोरोनाबाधित ४७६ नवीन रुग्ण आढळले आहेत. चाचणीच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याची टक्केवारी २०.८७ टक्के आहे. दिवसभरात २ रुग्णांचा मृत्यू झाला आणि यामुळे एकूण मृत्यू ८५० झाले आहेत. प्रत्यक्ष उपचार चालू असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ४ सहस्र ५६५ वर पोचली आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण पुढील केंद्रांमध्ये आहेत. पर्वरी सुमारे ५००, मडगाव ४६६, फोंडा ३४० आणि पणजी ३०७ रुग्ण.
कोरोनाबाधित रुग्णांना ‘डी-डिमर’ आणि ‘इंटरलुकीन’च्या ६ चाचण्या विनामूल्य देणारे गोवा पहिले राज्य ! – विश्वजीत राणे, आरोग्यमंत्री
पणजी – गोव्यात कोरोनाबाधित रुग्णांना ‘डी-डिमर’ आणि ‘इंटरलुकीन’च्या ६ चाचण्या विनामूल्य देणारे गोवा हे देशातील पहिले राज्य आहे. या चाचण्यांमुळे कोरोनाबाधित रुग्णांना वेळीच पुढील औषधोपचार करण्यास साहाय्य होत असते, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.