सर्व राज्यांनी उत्तराखंड सरकारच्या निर्णयानुसार मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करावीत अन्यथा आंदोलन करू ! – विहिंप

भाजपशासित राज्यांतील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी विहिंपने तेथील सत्ताधारी शासनकर्त्यांशी संवाद साधून तसे प्रयत्न करावेत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे. ज्या राज्यांमध्ये हिंदुद्वेषी पक्षांची सरकारे आहेत, तेथे मात्र हिंदूंचे परिणामकारक संघटन करून आंदोलन उभारण्याला पर्याय नाही !

नवी देहली – उत्तराखंड सरकारने चारधाम आणि ५१ मोठी मंदिरे यांना सरकारीकरणातून मुक्त करण्याचे दिलेले आश्‍वासन स्वागतार्ह आहे. अन्य राज्यांनीही असा निर्णय तात्काळ घेतला पाहिजे. अन्यथा विश्‍व हिंदु परिषद मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी देशव्यापी आंदोलन करण्याच्या सिद्धतेत आहे, अशी प्रतिक्रिया विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बंसल यांनी या प्रकरणी व्यक्त केली आहे.

विहिंपचे केंद्रीय मार्गदर्शक मंडळाचे पदाधिकारी स्वामी डॉ. श्यामादेवाचार्य महाराज यांनी म्हटले की, सनातन परंपरेचे प्रतीक असलेल्या आमच्या मंदिरांची आक्रमणकर्त्यांनी तोडफोड केली. आता सरकार त्यावर नियंत्रण मिळवून सनातन संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही असे होऊ देणार नाही. मंदिरांवर सरकारचा नाही, तर सनातन समुदायाच्या पुरोहितांचा आणि स्थानिक लोकांचा अधिकार आहे.