विवाह समारंभाला येणार्‍यांनी लसीकरण करणे किंवा कोरोना चाचणीचा अहवाल ‘निगेटिव्ह’ असणे बंधनकारक !

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही विवाह समारंभासाठी ५० वर्‍हाडींची मर्यादा कायम !

पुणे – जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विवाह समारंभांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी विवाह समारंभासाठी ५० लोकांच्या उपस्थितीची अट कायम ठेवण्यात आली आहे. तसेच समारंभासाठी येणार्‍या ५० लोकांचे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे; मात्र लसीकरण झाले नसल्यास समारंभाला उपस्थित रहाणार्‍यांनी आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी ‘निगेटिव्ह’ असल्याचा अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. आदेशाचे पालन न केल्यास संबंधित प्रत्येक व्यक्तीला १ सहस्र रुपये दंड आकारला जाणार आहे.

यासह मंगल कार्यालयातील सर्व कर्मचार्‍यांचे लसीकरण केलेले असणे किंवा त्यांची आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी ‘निगेटिव्ह’ असल्याचा दाखला कर्मचार्‍यांनी समवेत बाळगावा. याचे उल्लंघन झाल्यास प्रत्येक व्यक्तीला १ सहस्र रुपये दंड आकारला जाणार असून मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनाकडून या आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्यांना १० सहस्र रुपयांचा दंड करण्याचे आदेश देशमुख यांनी दिले आहेत. मंगल कार्यालयांकडून नियमांचा वारंवार भंग झाल्यास त्यांचा परवाना रहित करण्याचीही कारवाई होणार आहे.