सातारा, ८ एप्रिल (वार्ता.) – जिल्ह्यातील ७२ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी १३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी दिली.
प्रदीप विधाते पुढे म्हणाले की, या निर्णयामुळे जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रे निरीक्षणाखाली रहाणार आहेत. भंडारा येथील शासकीय रुग्णालयास आग लागल्यानंतर राज्यातील सर्व रुग्णालयांचे अग्नी लेखापरीक्षण करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रांचा प्रस्ताव बनवण्यात आला. या कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून अनुमाने २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून लवकरच या कामांची निविदाप्रक्रिया राबवली जाणार आहे.