केरळ येथील ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकणार्‍या जिज्ञासूंनी नामजप चालू करून सेवा करायला आरंभ करणे

१. साधिकेने पाठवलेले लघुसंदेश वाचून जिज्ञासूने पुष्कळ प्रश्‍न विचारणे, तसेच ते स्वतःच्या मैत्रिणींना पाठवणे

माझ्याकडे जिज्ञासूंना संपर्क करण्याची सेवा होती. अमृता नावाची जिज्ञासू एरव्ही भ्रमणभाषवर बोलत नाही; पण दत्तजयंतीच्या वेळी मी तिला भ्रमणभाष केल्यावर ती माझ्याशी बोलली. ती मला ‘नामजप, सेवा, सत्संग आणि तिला पाठवत असलेल्या ‘जागो संदेश’ हे लघुसंदेश’ यांविषयी पुष्कळ प्रश्‍न विचारत होती. मी तिला म्हणाले, ‘‘मी तुला इंग्रजी आणि हिंदी या भाषांत लघुसंदेश पाठवते. तेव्हा तुला अडचण येते का ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘काही अडचण नाही. मी ते लघुसंदेश इंग्रजी आणि हिंदी भाषा जाणणार्‍या माझ्या मैत्रिणींना पाठवते. तुम्ही लघुसंदेश पाठवत रहा.’’ हे ऐकून मला पुष्कळ आनंद झाला.’ – सौ. शालिनी सुरेश, केरळ

२. निराशेत असलेल्या चुलतभावाने नामजप चालू करणे आणि सत्संग ऐकणे अन् त्यानंतर त्याला अडचणींना सामोरे जाण्यासाठी बळ मिळणे

‘एका नातेवाईकाकडून मला समजले, ‘माझा चुलतभाऊ पुष्कळ निराशेत आहे.’ मी चुलतभावाच्या पत्नीला याविषयी विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘तो नकारात्मक विचारात आहे.’’ नंतर मी चुलतभावाला भ्रमणभाष केला आणि त्याला ‘कुलदेवता आणि दत्तगुरु’ यांचा नामजप करण्याविषयी सांगितले. त्यानंतर चुलतभावाने नियमित नामजप करायला प्रारंभ केला. त्याने पहिली ‘ऑनलाईन’ सत्संग शृंखला ऐकली. आता ‘त्याला येणार्‍या अडचणी दूर झाल्या आहेत’, असे नाही; पण त्याला अडचणींना सामोरे जाण्याचे बळ मिळत आहे. त्याची पत्नीही आता साधना करू लागली आहे. तिनेही ‘ऑनलाईन’ सत्संग शृंखला ऐकली आणि ती नियमित सत्संगही ऐकते. त्या दोघांनाही काही अडचणी आहेत; पण आता ते दोघेही साधना करू लागले आहेत. (मी २२ वर्षांपूर्वी मुंबई सोडतांना त्यांना नामजपाविषयी सांगितले होते; पण तेव्हा त्यांनी ते गांभीर्याने घेतले नव्हते. आता ते साधना करत आहेत.)’ – श्री. नंदकुमार कैमल, केरळ