भंडारा – जिल्ह्यातील खासगी आणि शासकीय रुग्णालयांतील अतीदक्षता विभाग भरले आहेत. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती विदारक आहे. नागरिकांनी स्वतःचे दायित्व समजून घेऊन कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. लसीकरणामधील सहभाग वाढवावा तसेच ४५ वर्षांच्या वरील सर्वच पात्र व्यक्तींनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. जिल्ह्यात ‘दळणवळण बंदी’ लागू न करता निर्बंध अधिक कठोर करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे खासदार सुनील मेंढे यांनी ५ एप्रिल या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केली.
ते पुढे म्हणाले की, गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात प्रतिदिन ५०० हून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आरोग्ययंत्रणेवर ताण पडत आहे. खासगी कोरोना रुग्णालयातील खाटा भरल्या आहेत. जिल्ह्यात एकूण १२ खासगी कोरोना रुग्णालये असून या रुग्णालयांतील ३०१ खाटांपैकी २५६ खाटा भरल्या असून ५ रुग्णालयांतील ४५ खाटा रिकाम्या आहेत. खासगी रुग्णालयांत ‘रेमडीसीव्हीअर’ इंजेक्शन आणि ऑक्सिजन यांचा तुटवडा आहे. जिल्ह्यातील ७ तालुक्यांत १४ ठिकाणी शासकीय कोरोना प्रभाग सिद्ध करण्यात आले असून त्यात ७६६ खाटा आहेत. त्यांपैकी २०७ खाटा भरल्या आहेत. कोरोनाच्या रुग्णांवर उपचारांसाठी १५९ खाटा आहेत, तर अतीदक्षता विभागात ५० खाटांपैकी केवळ ४ खाटा रिकाम्या आहेत.