मुंबई – दळणवळण बंदी राज्यशासन आणि तुम्हा-आम्हाला कुणालाच नको आहे; पण वाढणारी रुग्णसंख्या, आरोग्य यंत्रणेवरील बोजा अल्प करायचा असेल, तर नियम पाळायलाच हवेत. दायित्वशून्य नागरिकांमुळे कोरोनाचा धोका वाढत आहे, असे वक्तव्य मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी २ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत केले.
या वेळी सौ. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ‘‘आपण याआधीही रुग्णसंख्या शून्य करून दाखवली आहे. जगात दुसरी लाट तीव्रतेने आलेली दिसत आहे. लोकांनी घाबरू नये; पण स्वत:ला सांभाळा आणि नियम पाळा. दैनंदिन व्यवहार चाललेच पाहिजेत; मात्र त्याचा अर्थ ‘कसेही वागा आणि रुग्णसंख्या वाढावा’, असा होत नाही. शेवटी कोणताही निर्णय हा मुंबईकरांच्या हिताचा, संरक्षणार्थ असणार आहे. उगाच घ्यायचा म्हणून निर्णय घेणार नाही. कोरोनावर राजकारण चालू असून जनतेला उकसवले जात आहे. या आधीच्या दळणवळण बंदीमध्ये जनतेने चांगली साथ दिली. मागील १ वर्षात अनेकांना मोठा धक्का बसला आहे, पण शेवटी वाचलो, तरच लढू शकतो. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही निर्णय घेत आहेत. त्यावर राजकारण होता कामा नये.’’