संभाजीनगर – कोरोना संकट काळातील ‘दळणवळण बंदी’चा निर्णय प्रशासनाने रहित केल्यानंतर एम्.आय.एम्.चे खासदार इम्तियाज जलील यांना खांद्यावर घेऊन त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केले म्हणून प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. ‘कोणीही नियमांचे उल्लंघन केले, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे जलील यांच्यावर गुन्हा नोंद होणार असून त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई केली जाणार आहे’, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ३१ मार्च या दिवशी एका माध्यमाशी बोलतांना दिली. (खासदार जलील यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्याचे अनुकरण जनताही करू शकते. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी केवळ बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष जलील यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची कृती करून दाखवणे हे जनतेला अपेक्षित आहे. – संपादक)
संभाजीनगर येथे ३० मार्चपासून कठोर ‘दळणवळण बंदी’ लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र सामान्य नागरिकांमधून व्यक्त होणारा तीव्र रोष, आमदार-खासदार, व्यापारी यांसह विविध संघटनांकडून होणारा विरोध यांमुळे जिल्हा प्रशासनाने ३१ मार्चपासून ‘दळणवळण बंदी’ लागू न करण्याचा निर्णय घेतला. ३० मार्च या दिवशी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय घोषित केला होता; मात्र यानंतर इम्तियाज जलील यांनी नियमांचे उल्लंघन करत कार्यकर्त्यांसमवेत जल्लोष केला. याविषयी चव्हाण पुढे म्हणाले की, सामान्य माणसावर जशी कारवाई होते, त्याच पद्धतीने लोकप्रतिनिधींनी नियम मोडला, तर त्यांच्यावरही गुन्हा नोंद होईल, तसेच लोकांनी नियमांचे पालन करावे, अशी सूचना त्यांनी केली.
खासदार जलील यांचे आवाहन म्हणजे ‘लोकासांगे ब्रह्मज्ञान आणि स्वत कोरडे पाषाण !’‘दळणवळण बंदी’चा निर्णय रहित झाल्यानंतर खासदार जलील म्हणाले की, हा जनतेचा विजय आहे. आरोग्य कर्मचार्यांची रिक्त पदे भरण्याचे आश्वासन पालकमंत्री आणि आयुक्त यांनी दिले आहे. आता मोर्चा काढण्याची आवश्यकता भासणार नाही. ‘दळणवळण बंदी’ नसली, तरी कोरोना संपलेला नाही. त्यामुळे कोणीही ‘मास्क’विना बाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले होते. दुसरीकडे त्यांच्याच एम्.आय.एम्.च्या कार्यकर्त्यांनी ‘दळणवळण बंदी’चा निर्णय रहित झाला म्हणून जलील यांच्या घरासमोर मिरवणूक काढून केक कापून जल्लोष केला. विशेष म्हणजे इतरांना ‘मास्क’ वापरण्याचे आवाहन करणारे खासदार जलील आणि त्यांच्या एकाही कार्यकर्त्याने ‘मास्क’ घातलेला नव्हता. त्यांनी संचारबंदीच्या नियमांचेही उल्लंघन केले. |
खासदार जलील यांच्यावर गुन्हा नोंद न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू ! – भाजप नेत्यांची चेतावणी
संभाजीनगर – दळणवळण बंदी रहित झाल्याच्या घोषणेनंतर संचारबंदी असतांनाही खासदार इम्तियाज जलील यांनी मिरवणूक काढून नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा, या मागणीसाठी भाजपच्या वतीने सिटी चौक पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. गुन्हा नोंद न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, अशी चेतावणी भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी ३१ मार्च या दिवशी दिली. या वेळी माजी महापौर भगवान घडामोडे, माजी उपमहापौर राजू शिंदे, समीर राजूरकर राजगौरव वानखेडे, राजेश मेहता, शिवाजी दांडगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.