डेरवण (चिपळूण) येथील राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत मिरज-सांगली येथील केळकर स्मृती योगवर्गाच्या योगपटूंचे दैदिप्यमान यश !

सनातनचा बालसाधक अर्जुन गिरीश पुजारी याला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक

तृतीय क्रमांकाचे बक्षीस स्वीकारतांना चि. अर्जुन पुजारी

मिरज, ३१ मार्च (वार्ता.) – डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत मिरज येथील पाठक वृद्धाश्रमातील केळकर स्मृती योग वर्गाच्या योगपटूंनी दैदिप्यमान यश संपादन करून नावलौकिक मिळवला. या स्पर्धेत मिरज येथील कु. सर्वेश पाठक (वय ११ वर्षे) याने प्रथम क्रमांक, कु. राजवर्धन मोरे (वय १२ वर्षे) याने द्वितीय क्रमांक, तर सनातनचा बालसाधक कु. अर्जुन गिरीश पुजारी (वय ११ वर्षे) याने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

स्पर्धेत योगासने सादर करतांना चि. अर्जुन पुजारी

१४ वर्षे वयोगटातील मुलींच्या स्पर्धेत सांगलीच्या कु. मृण्मयी कुलकर्णीने तृतीय क्रमांक, तसेच १० वर्षे वयोगटातील मुलींच्या स्पर्धेत मिरजेच्या कु. सई पाटीलने द्वितीय क्रमांक मिळवला. शीर्षासन, पद्मशीर्षासन, चक्रबंधासन, सर्वांगासन, चक्रासन अशी अनेक योगासने या योगपटूंनी स्पर्धेत सादर केली.

तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकासह कु. अर्जुन पुजारी

या विद्यार्थ्यांना मिरज येथील पाठक वृद्धाश्रमातील केळकर स्मृती योगवर्गाचे योगशिक्षक श्री. दीपक दुर्गाडे, श्री. आशिष माळी, श्री. कुणाल शिंदे, कु. मयुरी धुमाळ आणि सौ. अंजली केळकर यांचे प्रशिक्षण, तसेच जिल्हा क्रीडा मार्गदर्शक अधिकारी श्री. रविभूषण कुमठेकर यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. डॉ. मुकुंदराव पाठक यांचेही विशेष सहकार्य लाभले.

क्षणचित्रे

१. ‘राष्ट्रहितालाच सर्वोच्च प्राधान्य’, हे क्रीडा महोत्सवाचे बोधवाक्य मुख्य स्वागत कमान आणि अन्य ठिकाणी लावले होते.

२. ‘खेळाडू कसा घडवाल ?’, या विषयावर प्रबोधनात्मक कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आला.