पत्रकारांनी कोरोना लस घेणे काळाची आवश्यकता ! – किशोर पाटील, कोकण विभागीय सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ

किशोर पाटील,

ठाणे, ३१ मार्च (वार्ता.) – कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून रुग्णांची संख्याही वाढत आहे. वृत्तसंकलन करत असतांना पत्रकारांचा समाजातील विविध घटकांशी संपर्क येतो. पत्रकार ज्यांची वृत्ते प्रसिद्ध करण्यासाठी जिवाचे रान करतात, त्या व्यक्ती मात्र पत्रकारांवर कठीण प्रसंग ओढवल्यावर साथ देण्यासाठी येत नाही; म्हणून आपण सर्वांनी वेळीच आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. वर्ष २०२० मध्ये पत्रकारांनी प्रशासनाला सहकार्य केले आहे, अशा माझ्या सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी यांनी ‘कोविड योद्धा’ म्हणून कोरोना प्रतिबंधक लस घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी, असे जाहीर आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सरचिटणीस आणि दैनिक ‘स्वराज्य तोरण’चे संपादक श्री. किशोर पाटील यांनी ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, नवी मुंबई आणि पुणे आदी जिल्ह्यांतील सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी यांना केले आहे.
ते पुढे म्हणाले…

१. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सध्या कोरोनाची प्रतिबंधक लस नागरिकांना देण्याचे कार्य राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे चालू आहे. ही लस देतांना विविध टप्पे ठरवले असून लाभार्थीचा प्राधान्यक्रमही ठरवण्यात आला आहे; परंतु कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोलाचे योगदान देणारे माझे पत्रकार बंधू आणि भगिनी अद्यापही या प्रतिबंधक लसीपासून वंचित आहेत. त्यांनी आपल्या संपूर्ण चाचण्या करून लस घेणे काळाची आवश्यकता आहे.

२. भिवंडी शहरातील ज्येष्ठ पत्रकार रतन कुमार तेजे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तसेच मागील वर्षीही अनेक पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आपण सतर्क राहिले पाहिजे. माझा मास्क माझी सुरक्षा, माझे कुटुंब माझी जबाबदारी, मी जबाबदार याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शासनाच्या नियमांचे पालन करावे.

३. ज्या पत्रकार बांधवांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाने तातडीने साहाय्य करावे.