एस्.एस्.आर्.एफ्.च्या बोलिव्हिया येथील साधिका सौ. सिल्विया विझकारा यांना गरोदरपणी झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. गरोदरपण
१ अ. स्वतःत जाणवलेले पालट
१. ‘दिवस गेल्यावर पहिल्या ३ मासांत माझी साधना करण्याची, देवाला आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करण्याची, तसेच साधकांच्या सहवासात रहाण्याची तळमळ वाढली होती.
२. पाचव्या मासानंतर माझे साधनेचे प्रयत्न फारसे होत नव्हते.
३. गरोदर असतांना मला पुष्कळदा परात्पर गुरुदेवांचे मानस दर्शन होत असे.
४. मी गेली अनेक वर्षे माझ्यातील ‘रागीटपणा’ हा स्वभावदोष नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहे. ‘दिवस गेल्यावर माझ्यातील ‘रागीटपणा’ आणि ‘प्रतिक्रिया व्यक्त करणे’, हे स्वभावदोष न्यून झाले आहेत’, असे माझ्या लक्षात आले. कोणतेही विशेष प्रयत्न न करता ‘मी शांत आणि प्रेमळ झाले असून ‘कुठली तरी आंतरिक शक्ती मला शांत करत आहे’, असे मला जाणवत होते. ‘हे सर्व माझ्या पोटातील बाळामुळे होत आहे’, याची मला जाणीव झाली.
५. बाळाच्या अस्तित्वाने केवळ मलाच शांत केले, असे नाही, तर त्याने घरातील इतर कुटुंबीय आणि पाळीव प्राणी यांनाही शांत केले. माझे यजमान आणि वडील शांत झाले. एवढेच नव्हे, तर आमच्याकडे असणारा एक पाळीव कुत्रा, जो सर्वांना चावत असे, गरोदपणात तो माझ्याशी प्रेमाने वागत असे आणि ‘मी त्याला जवळ घ्यावे’, यासाठी माझ्या जवळ येऊन उभा रहात असे.
१ आ. गर्भाच्या सात्त्विकतेविषयी जाणवलेले सूत्र
१ आ १. गर्भाच्या हालचालीमुळे आनंद होऊन ‘बाळ सात्त्विक आहे’, असे जाणवणे : मी योगासनांच्या वर्गाला जात होते. तेथे येणार्या इतर गरोदर स्त्रिया ‘पोटातील बाळे पुष्कळ हालचाली करतात, आतून लाथा मारतात. त्यामुळे अस्वस्थ वाटते अन् काही वेळा रात्रीची झोप नीट होत नाही. बाळाच्या हालचालीमुळे अंग दुखते’, असे सांगत. त्यांचे बोलणे ऐकून ‘माझ्या पोटातील बाळ हळूवारपणे आणि कमी हालचाली करते’, असे माझ्या लक्षात आले. जेव्हा बाळ हालचाल करत असे, तेव्हा मला आनंद होत असे. एकदा नामजपादी उपाय करतांना मला पहिल्यांदा पोटातील बाळाची हालचाल जाणवली. तेव्हापासून प्रत्येक वेळी बाळाने हालचाल केल्यावर ‘बाळ सात्त्विक आहे’, असे मला जाणवत असे.
१ इ. झालेले त्रास आणि आलेले अडथळे : गरोदरपणाच्या काळात मला अनेक अडथळे आले.
१ इ १. पहिले ३ मास : या काळात माझा गर्भपात होण्याची शक्यता वाढली होती. त्यामुळे आधुनिक वैद्यांनी मला दीड मास संपूर्ण विश्रांती (बेड रेस्ट) घ्यायला सांगितली होती.
१ इ २. ४ ते ५ मास : या कालावधीत आमच्या देशातील राजकीय स्थिती अत्यंत गंभीर होती आणि सर्वत्र हिंसाचार वाढला होता. आमच्या परिसरातील लोकांना विविध समुदायांचे लोक वेगवेगळ्या धमक्या देत होते. या अवघड काळात केवळ देवाच्या कृपेने आम्ही जवळच असलेल्या ला पाझ येथील एस्.एस्.आर्.एफ्.च्या सेवाकेंद्रात पोचू शकलो.
१ इ ३. सहावा मास : ६ व्या मासात आधुनिक वैद्यांनी एक चुकीचे निदान केल्यामुळे मला ९ दिवस रुग्णालयात भरती व्हावे लागले. माझ्या गर्भाशयातील द्रवाची पातळी पुष्कळ घटली होती. ‘बाळ ६ व्या मासात जन्माला येईल’, असा अंदाज बांधून आधुनिक वैद्यांनी शस्त्रक्रियेची सिद्धता केली. या मासात जन्मलेल्या बाळांची जिवंत रहाण्याची शक्यता केवळ ५० टक्के असते. बाळ सुरक्षित रहाण्यासाठी मी १ मास पूर्ण विश्रांती घेतली.
१ इ ४. आठवा आणि नववा मास : या कालावधीत जगात सर्वत्र आणि आमच्या देशातही ‘कोरोना महामारी’मुळे दळणवळण बंदी घोषित करण्यात आली. बंदीचे नियम अत्यंत कडक असतांनाच बाळ जन्माला आले.
हे सर्व अडथळे येऊनही आम्ही, म्हणजे मी आणि बाळ शांत अन् आनंदी होतो. या कठीण काळात ‘देव आणि गुरुदेव आमचे रक्षण करत आहेत, तसेच प्रत्येक कठीण प्रसंगात मार्गदर्शन करत आहेत’, याची मला प्रकर्षाने जाणीव होत होती. या कालावधीत बाळाने प्रत्येक वेळी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि मलाही स्थिर राहून प्रत्येक प्रसंग स्वीकारता आला. ‘माझ्या यजमानांच्या माध्यमातून देव आणि गुरुदेव येथे उपस्थित आहेत’, असे मला जाणवत असे. या कठीण काळात माझे यजमान स्थिर आणि शांत होते. त्यांनी अत्यंत प्रेमाने मलाही स्थिर रहाण्यास साहाय्य केले.
१ ई. अनुभूती
१ ई १. सेवाकेंद्रातील ध्यानमंदिरात बसून नामजप करतांना आलेली अनुभूती
१ ई १ अ. गरोदर असतांना देव आणि गुरुदेव यांना ‘बाळाचे पालनपोषण करण्यासाठी आंतरिक शुद्धी करा’, अशी प्रार्थना केल्यावर सहस्रारातून शरिरातील प्रत्येक अवयव अन् गर्भाशय येथे सोनेरी प्रकाश प्रवेश करत असल्याचे दृश्य दिसणे : १४.१०.२०१९ या दिवशी संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत मी ला पाझ येथील सेवाकेंद्रात असलेल्या ध्यानमंदिरात बसून नामजप करत होते. त्या वेळी मी ३ मासांची गर्भवती होते. माझा नामजप एकाग्रतेने होत असल्याने मला पुष्कळ शांत वाटत होते. नामजप करतांना मी देवाला आणि परात्पर गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘जन्माला येणार्या बाळासाठी मला एक ‘आदर्श आई’ बनता येऊ दे. त्यासाठी तुम्हीच माझ्यात पालट घडवा, जेणेकरून बाळामध्ये आध्यात्मिक गुण विकसित होऊन त्याला मानवजातीला आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करता येईल. माझे अंतर्मन शुद्ध करा. माझे मन, बुद्धी आणि अहं यांचा लय करा. माझ्यातील ‘राग येणे’ आणि ‘अपेक्षा करणे’, हे स्वभावदोष मुळापासून नष्ट करा, तरच मला बाळाचे संगोपन आध्यात्मिकदृष्ट्या करता येईल !’ ‘आपत्काळात या बाळाच्या माध्यमातून आम्हाला आध्यात्मिक साहाय्य मिळावे, यासाठी ईश्वरेच्छेनुसार त्याचा जन्म होत आहे’, याची मला जाणीव झाली. तेव्हा मला ‘माझ्या सहस्रारातून शरिरात सोनेरी प्रकाश प्रवेश करत आहे आणि हा प्रकाश संपूर्ण शरिरात, विशेषतः गर्भाशयात जात आहे’, असे दिसले. ‘बाळाला शांत आणि समाधानी वाटत आहे’, असे मला जाणवले.
१ ई १ आ. बाळाला सिंहासनाधिष्ठित देवतेच्या चरणी अर्पण केल्याचे दिसून ‘आपण सर्वांत सुरक्षित आणि आल्हाददायक ठिकाणी आहोत’, असा विचार मनात येणे : मला आणखी एक दृश्य दिसले, ‘मी बाळाला सिंहासनावर विराजमान असलेल्या देवतेच्या पावन चरणी अर्पण केले आहे.’ काही दिवसांपूर्वी एका सोहळ्यात परात्पर गुरुदेवांनी सर्वांना श्रीरामाच्या रूपात दर्शन दिले होते. त्या वेळी ते ज्या सिंहासनावर बसले होते, ते सिंहासन आणि मला दिसलेले देवाचे सिंहासन सारखेच होते. आम्ही देवाच्या पावन चरणांजवळ बसलो होतो आणि तेथे सभोवताली कमळे फुलली होती. त्या वेळी ‘आम्ही सर्वांत सुरक्षित आणि आल्हाददायक ठिकाणी आहोत’, असा विचार माझ्या मनात आला. मला ‘ईश्वराच्या चरणांजवळ बसून रहावे’, असे वाटत होते. ईश्वराच्या चरणांचा सहवास मिळाल्याविषयी माझ्या मनात कृतज्ञता दाटून आली आणि माझा भाव जागृत झाला. काही क्षणांसाठी मला ईश्वराशी एकरूप झाल्यासारखे वाटले.
१ ई १ इ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रावर पडलेले सूर्यास्ताच्या वेळच्या आकाशाचे प्रतिबिंब पाहून रामनाथी आश्रमात केलेल्या आकाशाच्या निरीक्षणाची आठवण होणे : नामजप संपवून मी डोळे उघडले. तेव्हा माझ्या समोर असलेल्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रावर सायंकाळी दिसणार्या आकाशाचे प्रतिबिंब पडले होते. नुकताच सूर्य मावळला असल्याने आकाशात गडद गुलाबी, नारिंगी आणि पिवळ्या रंगांची उधळण झाली होती. ते पाहून मला रामनाथी आश्रमात वास्तव्याला असतांनाचा एक प्रसंग आठवला. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एकदा सत्शक्ति (सौ.) बिंदाताईंनी सर्व साधकांना बाहेर जाऊन आकाशाचे निरीक्षण करायला सांगितले होते. त्या वेळी आकाशात कृष्णतत्त्व जागृत झाल्याप्रमाणेे गुलाबी, नारिंगी आणि पिवळा हे रंग पसरले होते. त्या वेळी आकाशाकडे पाहून मला जे जाणवले होते, तेच आता या वेळीही आकाशाकडे पहातांना जाणवले. ‘देव येथेही माझ्या समवेत आहे’, असे जाणवून मला आनंद झाला. मला ही अनुभूती दिल्याविषयी मी कृतज्ञ आहे.
१ ई २. पाचवा मास – गुरुपादुकांची पूजा चालू असतांना मंत्र लावल्यावर पोटातील बाळाने हालचाल करणे थांबवणे : ‘१४.१२.२०१९ या दिवशी मी ला पाझ येथील सेवाकेंद्रात गुरुपादुकांची पूजा चालू होण्याची शांतपणे वाट पहात होते. त्या वेळी एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका श्रीमती सिल्विया दत्तोली यांनी पूजा चालू करण्याविषयी सूचना दिल्यावर माझ्या पोटातील बाळ हालचाल करत असल्याचे माझ्या लक्षात आले. पूजा चालू असतांना जेव्हा मंत्र चालू झाले, तेव्हा बाळाची हालचाल बंद झाली. ‘बाळाला पूजेच्या वेळी लावलेले मंत्र आणि पूजाविधी अनुभवायचा असल्याने ते शांत झाले आहे’, असे मला वाटले. एरव्ही बाळ पुष्कळ हालचाल करते. ‘बाळाने हालचाल करणे अकस्मात् बंद केले’, असेे प्रथमच घडले आणि त्यामुळे मला पुष्कळ आश्चर्य वाटले.
१ ई ३. सहावा मास – रुग्णालयात भरती केल्यावर खोलीत दैवी कण सापडल्यामुळे मनातील काळजी दूर होऊन भाव जागृत होणे : मी ६ मासांची गर्भवती असतांना मला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. ९.१.२०२० या दिवशी माझी आई श्रीमती सिल्विया दत्तोली रुग्णालयात आली होती. माझ्या खोलीत ती ज्या आसंदीवर बसली होती, तेथे तिला एक दैवी कण मिळाला. बाळाचा जन्म लवकर होण्याच्या शक्यतेमुळे सर्व कुटुंबीय काळजीत होते; मात्र दैवी कण सापडल्यावर आम्हा दोघींचा भाव जागृत झाला. या दैवी कणाच्या रूपाने देव आणि परात्पर गुरुदेव यांनी आम्हाला त्यांच्या अस्तित्वाची जणू प्रचीतीच दिली होती. त्यामुळे ‘आता सर्व काही योग्य होईल’, असा विश्वास मला वाटू लागला. या दैवी कणातील चैतन्यामुळे रुग्णालयातील माझ्या खोलीची शुद्धी झाल्याचे मला जाणवले.
१ ई ४. सातवा मास – बाळाने पोटात लाथ मारून मनातील अनावश्यक आणि नकारात्मक विचारांची जाणीव करून देणे आणि त्यानंतर एकाग्रतेने नामजप होणे : २.३.२०२० या दिवशी मला बरे वाटत नसल्यामुळे माझे नामजपात लक्ष नव्हते. माझ्या मनात प्रसूतीविषयी नकारात्मक आणि चिंतेचे विचार पुष्कळ वाढले असल्याने माझा नामजपही होत नव्हता. त्या वेळी बाळाने मला पोटातून एक जोरात लाथ मारली आणि मला नामजप बंद पडल्याची जाणीव झाली. आतापर्यंत बाळाने अत्यंत हळूवारपणे लाथा मारल्या होत्या. त्यामुळे या वेळी त्याने जोरात मारलेली लाथ माझ्या लक्षात आली. या कृतीतून बाळाने मला मनातील अनावश्यक विचारांविषयी सजग केले. त्यानंतर मला शांत वाटले आणि नामजप चालू झाला.
१ ई ५. प्रसूतीविषयी येणारे नकारात्मक विचार एका कागदावर लिहून तो कागद जाळल्यावर पोटावर दैवी कण सापडणे : माझ्या मनात येणारे नकारात्मक विचार आणि साधनेत येत असलेले अडथळे, जसे आरोग्याच्या तक्रारी, बाळ आणि गर्भारपण यांविषयी मी एका कागदावर लिहून काढत असे. ६.३.२०२० या दिवशी मी ते सर्व कागद अग्नीला अर्पण केले. त्या वेळी मी देवाला आणि परात्पर गुरुदेवांना ‘हे सर्व अडथळे तुमच्या पवित्र चरणी अर्पण करत आहे’, अशी शरणागतभावाने प्रार्थना केली. त्यानंतर काही वेळाने मला माझ्या पोटावर एक दैवी कण सापडला. या दैवी कणाच्या रूपाने ‘बाळाला काहीही होणार नाही’, याविषयी देवाने मला आश्वस्त केले आहे’, असे मला वाटले.
१ ई ६. नामजप करतांना सहस्रार आणि कपाळ या ठिकाणी संवेदना जाणवणे : ९.३.२०२० या दिवशी मी नामजप करत असतांना मला सहस्रार आणि कपाळ या ठिकाणी संवेदना जाणवू लागल्या. यापूर्वी ही अनुभूती मला परात्पर गुरु डॉक्टरांचेे स्थुलातून वास्तव्य असलेल्या सनातनच्या रामनाथी आश्रमात आली होती. याचे मला स्मरण झाले अन् माझी भावजागृती झाली. त्या वेळी माझ्या मनात ‘पोटातील बाळामुळेच माझ्याकडे ईश्वरी चैतन्याचा प्रवाह येत आहे’, असा विचार आला.
१ ई ७. आठवा मास – ‘रामनाथी आश्रमातील आध्यात्मिक कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी बाहेरून येणार्या साधकांची वाट पहाणे आणि बाळाच्या जन्माची वाट पहाणे, हे सारखेच आनंददायी आहे’, याची गुरुदेवांनी जाणीव करून देणे : १८.३.२०२० या दिवशी मी बगलामुखीस्तोत्र ऐकत होते. त्या वेळी माझ्या मनात ‘आता एका आठवड्यात बाळाचा जन्म होईल’, असा विचार आला आणि मला अनपेक्षितपणे उत्साह अन् आनंद वाटू लागला. मी सूक्ष्मातून परात्पर गुरुदेवांना याचे कारण विचारले. त्या वेळी त्यांनी मला एक दृश्य दाखवले. रामनाथी आश्रमात आयोजित करण्यात येणार्या कार्यशाळेला जे साधक बाहेरून येतात. त्यांचे स्वागत करण्यासाठी आश्रमातील काही साधक मार्गिकेत नमस्काराच्या मुद्रेत उभे असतात. ‘मीही तशाच प्रकारे अन्नपूर्णा कक्षाजवळ असलेल्या मार्गिकेत आनंदाने उभी आहे’, असे दृश्य मला दिसले. ‘या प्रसंगातील आणि बाळाच्या जन्माच्या आधी जाणवणारा उत्साह अन् आनंद सारखेच आहेत’, याची जाणीव मला गुरुदेवांनी करून दिली आणि मी ‘एका साधकाच्या आगमनाची वाट पहात आहे’, हे माझ्या लक्षात आले.
(क्रमश: उद्याच्या अंकात)
या पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/461597.html
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • दैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्या या कणांचे भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरमध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असल्याचे सिद्ध झाले. या घटकांच्या मूलद्रव्यांच्या प्रमाणावरून शोधलेले त्यांचे फॉर्म्युले सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कणांच्या फॉर्म्युल्याशी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना दैवी कण असे संबोधतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |