हिंदूंच्या कुंभमेळ्यासारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना किमान पायाभूत सुविधा मिळवण्यासाठी साधूसंतांना प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करावा लागत असेल, तर असे प्रशासन काय कामाचे ? अन्य धर्मियांविषयी प्रशासनाने अशी उदासीनता दाखवली असती का ?
हरिद्वार, १७ मार्च (वार्ता.) – बैरागी कॅम्पमधील आखाड्यांना ७ दिवसांत सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन कुंभमेळ्याचे मेळा अधिकारी दीपक रावत यांनी येथील पाहणी दौर्यात दिले. या प्रसंगी अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अणि आखाड्याचे अध्यक्ष श्री महंत राजेंद्र दास महाराज, श्री पंच दिगंबर अणि आखाड्याचे श्री महंत रामजी दार महाराज, श्री पंच निर्वाणी आखाड्याचे श्री महंत कृष्णदास महाराज यांच्यासह अन्य साधूसंत आणि सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
१. कुंभमेळ्याचे प्रथम पवित्र स्नान होऊनही अद्याप बैरागी कॅम्पमधील आखाड्यांना पायाभूत सुविधांसह भूमीचे देखील वाटप करण्यात आले नव्हते. परिणामी येथील आखाड्यांच्या संतांनी वारंवार अप्रसन्नता व्यक्त करूनही प्रशासनाकडून काहीच कृती होत नव्हत्या.
२. अखेर मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी वरील गोष्टींची नोंद घेऊन अधिकार्यांना फैलावर घेतले. त्यानंतर १६ मार्चला दीपक रावत यांनी पाहणी दौरा केला.
३. या वेळी रावत यांनी येथील भूमीवर काही ठिकाणी असलेले अतिक्रमण काढून भूमी वाटप करण्याचे आदेश दिले. तसेच आखाड्यांचे सीमांकन करून अंतर्गत रस्ते सिद्ध करणे, मुख्य रस्त्यापासून पिण्याच्या पाण्याच्या जोडण्या करणे, विद्युत् व्यवस्था करणे, शौचालय सुविधा पुरवणे आदी कामे ७ दिवसांत पूर्ण करण्यास सांगितले.