मुंबई, १४ मार्च (वार्ता.) – पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे मांसाची वाहतूक करतांना मारहाण केल्याचा आरोप करणार्या मटणविक्रेत्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी महाराष्ट्र शासनाचे मानद पशूकल्याण अधिकारी आणि गोरक्षक श्री. राजेश पाल यांसह सर्वश्री सनी, सन्डी आणि गोपी यांच्यावर गुन्हा नोंदवला. मुद्दसर अब्दुल रज्जाक शेख यांच्या आरोपावरून पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला असून त्यामध्ये श्री. राजेश पाल आणि अन्य गोरक्षक यांवर खंडणी अन् चोरी यांचेही गुन्हे नोंदवले. श्री. पाल यांना वसई सत्र न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी दिली असून पुढील सुनावणी १५ मार्च या दिवशी होणार आहे. गुन्ह्यामध्ये ११ मार्चच्या रात्री विक्रीसाठी मांसाची वाहतूक करणारे मुद्दसर शेख यांना श्री. राजेश पाल आणि त्यांचे सहकारी यांनी मारहाण केली. १५ ते १६ सहस्र रुपये आणि सोन्याची साखळी चोरल्याचा आरोप केला आहे. (श्री. राजेश पाल आणि गोरक्षक यांनी आतापर्यंत प्रामाणिकपणे गोरक्षणाचे कार्य केले आहे. अवैध मांसविक्री रोखण्यासाठी पोलिसांना सहकार्यही केले आहे. प्रामाणिक कार्य करणार्या गोरक्षकांवर गुन्हे नोंदवण्यापूर्वी पोलिसांनी सत्यता पडताळावी गोरक्षकांवर खोटे गुन्हे नोंदवणे, हे पोलिसांच्या विश्वासार्हतेेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करते! – संपादक)
खोटे गुन्हे नोंदवून राजेश पाल यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न ! – गोरक्षक
श्री. राजेश पाल यांच्यावर नोंदवलेल्या या गुन्ह्याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीकडे मत व्यक्त करतांना गोरक्षक म्हणाले, ‘‘श्री. पाल मागील अनेक वर्षे पालघर जिल्ह्यात गोरक्षणाचे कार्य प्रामाणिकपणे करत आहेत. गोवंशियांच्या अवैध मांसाच्या विरोधात ते सातत्याने पोलिसांत तक्रारही करत आहेत. त्यामुळे कसायांचा त्यांच्यावर राग आहे. मागील अनेक वर्षे पालघर जिल्ह्यातील अवैध मांसाची विक्री न थांबणे यातून कसायांचे पोलिसांशी असलेले आर्थिक संबंध उघड होत आहेत. गोरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे श्री. राजेश पाल यांच्या विरोधात खोटे गुन्हे नोंदवून त्यांचे खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे.
गोमाता आणि गोवंश यांची हत्या रोखण्यासाठी श्री. राजेश पाल यांचे प्रामाणिक प्रयत्न !
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या सीमेत होणारी अवैध मांसविक्री रोखण्यासाठी श्री. राजेश पाल यांनी आमरण उपोषण केले होते. श्री. पाल यांनी मांसाची अवैध विक्री करणार्या दुकानांची सूचीही महानगरपालिकेकडे दिली होती. त्यावर महानगरपालिकेकडून कारवाईचे आश्वासन देण्यात आले; पण प्रत्यक्षात मात्र त्यावर कारवाई झाली नाही. गोवंशियांच्या अवैध धंद्याला विरोध करत असल्यामुळे १९ ऑक्टोबर २०२० या दिवशी कसाई आणि धर्मांध यांनी श्री. राजेश पाल यांच्यावर जीवघेणे आक्रमण केले.
कसायांची बाजू घेणार्या पोलिसांच्या विरोधात न्यायालयात जाऊन राजेश पाल यांनी पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडले !२६ जुलै २०२० या दिवशी वसईतील पापडी येथे कसायांनी कत्तलीसाठी आणलेले ४४ गोवंशीय आणि म्हशी यांच्या सुटकेसाठी श्री. राजेश पाल यांनी वसई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या वेळी पोलिसांनी कसायांच्या खोट्या तक्रारीवरून श्री. पाल यांच्या विरोधात खोटा गुन्हा नोंदवला; पण कसायांच्या विरोधात ना कारवाई केली, ना गुन्हा नोंदवला. त्यामुळे श्री. राजेश पाल यांनी पोलिसांच्या विरोधात वसई सत्र न्यायालयात केलेल्या तक्रारीवरून न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर श्री. राजेश पाल यांच्या तक्रारीवर पोलिसांना कारवाई करावी लागली. प्रारंभी कसायांच्या बाजूने श्री. राजेश पाल यांच्यावर गुन्हा नोंदवणार्या पोलिसांनी त्यानंतर ४४ पैकी १५ गोवंशियांची अन्यत्रहून सुटका केली. |