सांगली येथील अधिवक्त्या प्रीती पाटील यांना ‘विविध सत्संगांतून आतापर्यंत सांगितलेले सर्व दृष्टीकोन ही ब्रह्मवाक्येच आहेत’, याविषयी ‘दळणवळण बंदी’च्या काळात आलेल्या अनुभूती
‘वर्ष २००१ पासून मी ‘सनातन संस्थे’च्या मार्गदर्शनाखाली साधनेला आरंभ केला. त्या वेळी माझ्यासारख्या अल्प बुद्धीच्या क्षुद्र जिवाला गुरुमाऊलीच्या अफाट शक्तीची कोणतीच कल्पना नव्हती किंबहुना आजही ती नाही; पण आता मला वाटते, ‘मी आजपर्यंत ‘साधनेतील दृष्टीकोन’ म्हणून ऐकलेली सर्व सूत्रे ‘ब्रह्मवाक्ये’च आहेत आणि काळानुसार मला त्याची प्रचीतीही येत आहे.’ मार्च २०२० पासून भारतात झालेल्या ‘कोरोना’च्या संसर्गामुळे ‘दळणवळण बंदी’ घोषित करण्यात आली. त्या वेळेपासून मला वरील सूत्राच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.
१. कुटुंबीय कसेही वागले, तरी ‘आपण घरात रहात नसून आश्रमात रहात आहोत’, असा भाव ठेवून नेहमी साधकत्वाला धरूनच वागले पाहिजे, असे शिकायला मिळणे आणि तसे प्रयत्न केल्यावर ‘दळणवळण बंदी’च्या काळात गुरुकृपेने कुटुंबियांचे सहकार्य मिळून विविध सत्संगांच्या माध्यमातून अखंड चैतन्यात रहाता येणे
पूर्वी काही साधक एक सूत्र सांगायचे, ‘कुटुंबातील एक व्यक्ती जरी साधना करू लागली; तरी गुरुमाऊली तिच्या सर्व कुटुंबियांचा उद्धार करणार आहे.’ तेव्हा माझ्या कुटुंबियांचा माझ्या साधनेला विरोध होता. त्यामुळे मला प्रश्न पडायचा की, माझ्या घरचे तर साधना करत नाहीत आणि मलाही साधनेला विरोधच करतात, तरी त्यांचा उद्धार कसा काय होणार ? त्या वेळी फारसे काही कळत नसल्याने मी केवळ ‘हो’ म्हणायचे.
काही मासांपूर्वी मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रक्रिया राबवत होते. तेव्हा मी एका सत्संगामध्ये कुटुंबियांविषयी माझ्या मनात असलेले पूर्वग्रहाचे काही प्रसंग सांगितले. त्या वेळी साधक मला जाणीव करून द्यायचे, ‘आपण घरात रहात नसून आश्रमात रहात आहोत आणि आश्रमात साधकच रहातात. मग त्यांच्याविषयी आपल्या मनात पूर्वग्रह ठेवायला नको.’ नंतर अनेकदा भाववृद्धी सत्संगामध्येही ‘कुटुंबियांविषयीचे आपले वागणे कसे आहे ?’, याविषयीची सूत्रे घेतली जायची. तेव्हा आरंभीच्या सत्संगात माझी चिडचिड झाली. एका सत्संगात सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनीही मला सांगितले, ‘‘कुटुंबीय कसेही वागले, तरी एक ना एक दिवस देवाला तुमची दया येईल. त्यामुळे आपण साधकत्वाला धरूनच वागले पाहिजे.’’ त्या वेळेपासून मी सत्संगांमध्ये सांगितल्यानुसार प्रयत्न चालू केले. ‘दळणवळण बंदी’च्या आधी सर्व दैनंदिन कामे करत असतांना पुष्कळ वेळा माझा वेळ वाया जात असे; पण आता घरात असूनही केवळ गुरुमाऊलीच्याच कृपेमुळे माझ्याकडून एकेक क्षण साधनेच्या दृष्टीने योग्य प्रकारे वापरला जात आहे. गुरुमाऊलीने मला वेगवेगळ्या सत्संगांच्या माध्यमातून अखंड चैतन्यातच ठेवलेे आहे. आता गुरुकृपेमुळे कुटुंबियांचे पुष्कळ सहकार्य लाभत असल्याने मी घरी असूनही या सत्संगांचा लाभ घेऊ शकते.
२. पूर्वी बरेच प्रयत्न करूनही नामजप करण्यासाठी पहाटे उठता न येणे; पण ‘दळणवळण बंदी’च्या काळात पहाटे सहजतेने उठता येणे
पूर्वी मी साधनेत आल्यापासून पुष्कळदा पहाटे उठून नियोजित घंटे (तास) नामजप पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचे; पण मला ते शक्य होत नव्हते. तेव्हा मला पुष्कळ त्रास होत होता; पण सध्या पहाटे ५ वाजता उठून मी सत्संग ऐकू शकते आणि नंतर बसून नामजपही करू शकते. ही माझ्यासाठी अतिशय मोठी अनुभूती आहे. इतक्या वर्षांत मला जे जमले नाही, ते ‘दळणवळण बंदी’च्या कालावधीत गुरुमाऊलीने मला सहज साध्य करून दिले.
३. सर्वांच्या दृष्टीने त्रासदायक असलेल्या ‘दळणवळण बंदी’च्या काळातही मनात साधनेचेच विचार येत असल्याने चांगले वाटणे
सर्वसामान्यांच्या दृष्टीने सध्या ‘दळणवळण बंदी’चा हा त्रासदायक काळ चालू आहे; पण मला सध्या पुष्कळ चांगले वाटत आहे; कारण या कालावधीमध्ये माझ्या मनामध्ये सेवेचे किंवा साधनेचे विचार येत आहेत. माझ्या मनाला एकच ध्यास लागला आहे, ‘अजूनही आपण साधना करायला न्यून पडत आहोत. आता माझे मन निर्मळ होऊन त्यात केवळ गुरुमाऊलीचाच निवास व्हायला हवा.’
४. भाववृद्धी सत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘प्रत्येक साधकाचे घर, म्हणजे सनातनचा रामनाथी आश्रम झाला आहे’, हे सूत्र सांगणे आणि ते ऐकतांना कृतज्ञताभाव जागृत होऊन भावाश्रू येणे
९.४.२०२० या दिवशी झालेल्या भाववृद्धी सत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितले, ‘‘विश्वातल्या प्रत्येक साधकाचे घर, म्हणजेच सनातनचा ‘रामनाथी आश्रम’ झाला आहे आणि सर्वांचे घर चैतन्याने भारित झाले आहे. त्यांनी हे सूत्र सांगायला आरंभ केल्यावर माझ्या मनात कृतज्ञताभाव जागृत होऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले.
५. प्रार्थना
‘हे विष्णुस्वरूप गुरुमाऊली, ‘तुला अपेक्षित अशीच प्रत्येक कृती माझ्याकडून घडू दे’, अशी तुझ्या कोमल चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– अधिवक्त्या प्रीती पाटील, सांगली (१२.४.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |