परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी साधकांना केलेले मार्गदर्शन

प्रत्येक जिवाची साधना व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे वेळोवेळी साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. ८ मार्च या दिवशी ‘प्रारब्ध आणि साधना’ हा विषय पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया. 

(भाग २)

भाग १ वाचण्यासाठी या लिंकवर किल्क करा : https://sanatanprabhat.org/marathi/457092.html

परात्पर गुरु डॉ. आठवले

२. साधनेविषयी शंकांचे निरसन

२ अ. ‘साधना झाली नाही’, याचे दुःख करत राहू नका आणि ‘समजले हे चांगले झाले’, अशी स्वयंसूचना घ्या !

कु. नागमणी आचार : ‘एकदा मी आश्रमात आले होते, त्यानंतर मी साधनेच्या दृष्टीने आपल्याला अपेक्षित असे प्रयत्न केले नाहीत, तर तुम्हाला तोंड कसे दाखवू ?’, असा विचार पुनःपुन्हा मनात येत होता.

परात्पर गुरु डॉक्टर : त्यासाठी स्वयंसूचना काय दिली ? ती द्यायला पाहिजे. जगातील कोणतीही समस्या असो, स्वभावदोष निर्मूलन या संदर्भातील ग्रंथात सांगितल्याप्रमाणे ‘अ १, अ २, अ ३, आ १, आ २, इ १, इ २’ या स्वयंसूचना पद्धतींमध्येच सर्व येते. सर्व समस्यांची उत्तरे त्यातच आहेत. ‘माझ्याकडून साधनेच्या दृष्टीने प्रयत्न झाले नाहीत’, या विचाराने दुःख होते. त्याऐवजी ‘अरे बरे झाले, आतातरी माझ्या हे लक्षात आले. आता मी तळमळीने प्रयत्न करीन’, अशी स्वयंसूचना दिली पाहिजे; नाहीतर ‘इ २’ या शिक्षापद्धतीचा उपयोग करीन. माझ्याकडून साधनेचे प्रयत्न झाले नाहीत, तर मी जेवणार नाही किंवा २ – ४ घंटे अल्पाहार घेणार नाही’, अशी स्वतःला शिक्षा करून घेतल्यास साधनेचे प्रयत्न नियमित होतील.

कु. नागमणी आचार : मी प्रयत्न करते.

२ आ. कौटुंबिक समस्यांमुळे साधनेवर परिणाम झाल्याची खंत बाळगण्यापेक्षा साधनेचे अविरत प्रयत्न करावे !

श्री. प्रेमप्रकाश : मला कौटुंबिक समस्या होती. आपल्या कृपेने ती समस्या दूर झाली; परंतु त्या काळात साधना आणि सेवाही थोडी अल्प झाली. मनाला याची मोठी खंत वाटते.

परात्पर गुरु डॉक्टर : असे सर्वांचेच होते. त्यासाठी अधिक खंत करू नका. साधना आणि नामजप नियमित होण्यासाठी मनाला  स्वयंसूचना द्यायची. नंतर साधना चांगली झाली की, ५० टक्के, ६० टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त करून साधनेत लवकर लवकर पुढे जायचे असते. तुम्हाला आता हे बुद्धीला समजले. घरी जाऊन प्रत्यक्ष साधनेचे प्रयत्न करायचे आहेत. साधनेत ‘मी करीन’, असे म्हणून प्रयत्न होत नाहीत. आपल्याला विचारणारे कुणीतरी पाहिजे, तरच आपण प्रयत्न करतो. ‘आजची स्वयंसूचनांची सत्रे केलीत कि नाही ?’, असे कुणी विचारले, तरच साधक प्रयत्न करतात. त्यामुळेच आपण आढावा देण्याची पद्धत वापरतो . स्थानिक साधकांना साधनेचा आढावा द्या. त्यांना प्रतिदिन दूरभाष करून आढावा द्या. यानेही प्रयत्न होत नसतील, तर शिक्षापद्धतीचा अवलंब करा. जवळ जवळ ६० – ७० टक्के साधकांना स्वतःला शिक्षा (सेल्फ पनिशमेंट) स्वत:च्या प्रकृतीनुसार घ्यावी लागते, तरच ते साधनेत पुढे पुढे जातात.

२ इ. ‘साधनेमध्ये का अल्प पडतो’, याच्या मुळापर्यंत जाऊन स्वयंसूचना घ्या !

सौ. राखी मोदी : साधना वाढवण्यासाठी कसे प्रयत्न करायला पाहिजेत ? मी साधनेत पुष्कळच अल्प पडते.

परात्पर गुरु डॉक्टर : साधनेत आपण अल्प पडतो, म्हणजे आपण साधनेचे प्रयत्न करत नाही. स्वभावदोष सारणीत (डेली चार्ट) प्रतिदिन होणार्‍या चुका लिहित नाही. मनाला स्वयंसूचना देत नाही आणि नामजप करत नाही. जसे मुले ऐकत नसतील, तर आई-वडील त्यांना रागावतात, तरीही मुलाने ऐकले नाही, तर ते त्याला मारतात, म्हणजेच तो सुधारावा; म्हणून त्याला शिक्षा करतात. त्याच प्रकारे स्वतःला शिक्षा घ्यायची आहे. साधनेचे प्रयत्न केले नाहीत किंवा सारणी लिखाण केले नाही, तर ‘जोपर्यंत लिखाण करणार नाही, स्वयंसूचना सत्र करणार नाही, नामजप करणार नाही; तोपर्यंत मी अल्पाहार घेणार नाही. चहा घेणार नाही. भोजन घेणार नाही’, अशी शिक्षा स्वतःलाच करायची. असे काही सप्ताह केले, तर मनाला ऐकावेच लागते. वेळ मिळाला नाही किंवा अन्य कारणाने स्वयंसूचना सत्र न करणे, म्हणजे ‘आपण आपल्या मनाचे ऐकतो’, असे झाले. मूलभूत सिद्धांत काय आहे ? जो आपल्या इच्छेने, म्हणजेच स्वेच्छेने सर्व करतो, त्याला प्राणी, म्हणजे ‘देहधारी मनुष्य प्राणी’, असे म्हणतात. मनुष्यजन्म मिळाला आहे, तर आपल्याला प्राणी बनायचे आहे का ?

सौ. राखी मोदी : नाही.

परात्पर गुरु डॉक्टर : मनुष्य देहधारी प्राणी आणि दुसरे प्राणी यांमध्ये भेद काय आहे ? भेद एवढाच आहे की, मानवाला शिंग आणि शेपूट नाही, बाकी तो प्राण्याप्रमाणेच वागत आहे. तुम्ही सत्संग घेता ना ? त्यातसुद्धा ‘इ २’, नुसार सूचना घेणे हे सूत्र सांगा. आपली साधना ‘अ’, ‘आ’ या स्वयंसूचना पद्धतीनुसार होत नसल्यास ‘इ’ पद्धतीचा उपयोग करा.

जगात अशी कोणतीच समस्या नाही, जिला उत्तर ‘नाही’. प्रारब्ध ही समस्या आहे, तर तिचे ‘साधना’ हे उत्तर आहे. स्वभावदोषांची समस्या आहे, तर स्वयंसूचना सत्र हे उत्तर आहे.

सौ. राखी मोदी : म्हणजे मी विचारांमध्येच अडकून पडते. मी आश्रमातून एखादी चांगली गोष्ट शिकून गेले की, घरी गेल्यावर ‘हे चालू करायचे, ते करायचे’, असे विचार असतात. माझी क्षमतासुद्धा आहे करण्याची; परंतु मला त्याच्यापुढे जाताच येत नाही. प्रत्यक्ष कृती करण्यात मी अल्प पडते.

परात्पर गुरु डॉक्टर : त्यासाठीच तर हे सर्व सांगितले.

सौ. राखी मोदी : ‘जेवढी सेवा आहे, तेवढ्याच मर्यादेत राहून ती चांगली करू’, असे होते.

परात्पर गुरु डॉक्टर : तुम्हाला पुढे जायचे आहे; पण तुम्ही पुढे जात नसाल, तर ‘का जात नाही ?’, याचा विचार करून मुळापर्यंत जायचे. त्याचे ‘असे वाटण्याचे कारण काय आहे’, हे समजले की, त्यासाठी अ १, अ २, अ ३ या पद्धतींचा उपयोग करून स्वयंसूचना द्यायची आणि स्वयंसूचना न दिल्यास स्वत:च्या प्रकृतीनुसार जेवणार नाही’, अशी स्वतःला शिक्षा घ्यायची.


भाग ३. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/457878.html