६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या भावसोहळ्याच्या वेळी जाणवलेली सूत्रे

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. भावसोहळ्यासंदर्भात सूक्ष्मातून जाणवलेली काही सूत्रे

१ अ. भावसोहळ्यात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाचे तत्त्व अधिक प्रमाणात साधकांना मिळेल’, असे जाणवणे : जन्मोत्सवाच्या भावसोहळ्यात ‘भगवान श्रीकृष्णाचे तत्त्व परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या माध्यमातून साधकांना अधिक प्रमाणात मिळेल’, असे मला जाणवत होते. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी भगवान श्रीकृष्णाप्रमाणे वेशभूषा केली आहे आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ त्यांना ओवाळत आहेत’, असे मला जाणवले.

१ आ. ‘सध्या परात्पर गुरुदेवांची प्राणशक्ती २८ ते २९ टक्के आहे आणि त्यांना ग्लानी अन् थकवा येण्याचे प्रमाण अधिक आहे’, असे मला जाणवत होते. (बरोबर आहे. – संकलक)

१ इ. ‘आश्रमस्तरावर भावसोहळ्यानिमित्त साधकांना प्रसादसुद्धा देण्यात येईल’, असे मला जाणवले.

अधिवक्ता नीलेश सांगोलकर

२. दुसर्‍या भावसोहळ्यात श्रीरामाचे तत्त्व अधिक प्रमाणात मिळणार असल्याचे जाणवणे

‘दुसर्‍या भावसोहळ्यातून सर्व साधकांना प्रभु श्रीरामचंद्राचे तत्त्व अधिक प्रमाणात मिळणार आहे. साक्षात् परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले भगवान श्रीराम रूपामध्ये असणार आहेत आणि त्यांच्या दर्शनाचा लाभ सर्वांना होणार आहे’, असे मला जाणवले.

३. दुसर्‍या भावसोहळ्यात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती 

३ अ. भावसोहळ्याची सिद्धता करतांना ती आश्रमात करत असल्याचे जाणवणे आणि सर्व कृती परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सूक्ष्मातून विचारून करणे अन् काही वेळाने ‘त्यांनी येऊन सिद्धता चांगली झाली आहे’, असे सांगितल्याचे जाणवणे : ईश्‍वराच्या कृपेने भावसोहळ्याची सिद्धता घरी करत नसून आश्रमातच करत असल्याचे जाणवत होते. सिद्धता करतांना प्रत्येक गोष्ट परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सूक्ष्मातून विचारून केली जात होती. तेव्हा दुपारी एक वाजता घरात आढावा आणि नामजपासाठी ज्या खोलीत बसतो, (त्या खोलीतच आतापर्यंत घरी आलेले सर्व संत आणि सद्गुरु यांच्या निवासाचे नियोजन केले जायचे) त्या खोलीतून परात्पर गुरु डॉ. आठवले आल्याचे मला जाणवले. ते मला म्हणाले, ‘सर्व सिद्धता झाली का ?’ त्या वेळी ‘काही सिद्धता राहिली आहे’, असे मी त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘सिद्धता छान झाली आहे. सर्व सिद्धता झाली की, बोलवा. तोपर्यंत मी विश्रांती घेतो.’ त्या वेळी या पूर्ण भावसोहळ्यामध्ये घरातच परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे अस्तित्व जाणवत होते.

३ आ. भावसोहळ्याच्या वेळी मन निर्विचार आणि शांत असणे अन् त्या वेळी दाखवलेल्या चलच्चित्रातील प्रत्येक कृती अंतर्मनात खोलवर रुजत असल्याचे जाणवणे : भावसोहळ्याच्या वेळी माझ्या मनाची अवस्था निर्विचार आणि शांत असल्याचे जाणवत होते. भावसोहळा चालू असतांना त्यातील प्रत्येक चलच्चित्रातील कृती माझ्या अंतर्मनापर्यंत जात आहे आणि ती खोलवर रुजत असल्याचे मला जाणवत होते.

३ इ. भावसोहळ्यात ध्यानावस्था आणि स्वयंसूचना देणे, असे दोन्ही एकाच वेळी अनुभवता येणे : भावसोहळा चालू असतांना नामजप ध्यानाप्रमाणे चालू होता. त्याच वेळी स्वयंसूचना देण्याचा भागही आपोआप झाल्याचे जाणवले. ध्यानावस्था आणि स्वयंसूचना हे दोन्ही एकाच वेळी अनुभवता आले.

३ ई. ‘आपले परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले, हे साक्षात् भगवान विष्णुस्वरूप आहेत. त्यांचा आपण सर्वांनी लाभ करून घ्यावा आणि आपण या जन्माचे सार्थक करावे’, हा दृढनिश्‍चय रोमारोमात होत असल्याचे जाणवत होते.’

– अधिवक्ता नीलेश आप्पासाहेब सांगोलकर, पंढरपूर.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक