उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असतांना आयोजित होणार्या कुंभमेळ्याच्या नियोजनामुळे संत, महंत अप्रसन्न होत असतील, तर याचा विचार सरकारने केला पाहिजे !
हरिद्वार (उत्तराखंड) – राज्य सरकार स्वतःच्या त्रुटी लपवण्यासाठी कोरोनाच्या नावाखाली घेतलेले निर्णय संतांच्या माथी मारत आहे, असा आरोप अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांनी येथे केला. कुंभमेळ्याचा कालावधी आणि संतांना सुविधा न पुरवल्यावरून त्यांनी सरकारवर टीका केली. संन्यासी आखाडे आणि संत यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते बोलत होते. संन्यासी आखाड्यांना सरकारकडून सुविधा न पुरवल्याने ते अप्रसन्न असल्याने महंत गिरि त्यांना भेटण्यासाठी येथे आले होते.
महंत नरेंद्र गिरि म्हणाले की, प्रयागराज आणि वृंदावन येथील कुंभमध्ये आम्हाला कुठलीही अडचण आली नाही, तर देवभूमीमध्ये अडचण कशी येऊ शकते ? अखिल भारतीय आखाडा परिषदेला सांगून मुख्यमंत्र्यांनी ४ राजयोगी स्नानाची घोषण केली होती; मात्र संतांना विश्वासात न घेता सरकारने त्याची संख्या २ केली आणि कुंभचा कालावधीही अल्प केला. संत सरकारचे निर्णय स्वीकारण्यास सिद्ध नाहीत.