श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी संख्येवर मर्यादा
प्रतिदिन केवळ १० सहस्र भाविकांना दर्शन घेता येणार
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने १० सहस्र भाविकांना प्रवेश ‘पास’ देण्यात येत आहेत. यापूर्वी ३० सहस्र भाविकांना दर्शन घेता येत होते. गर्दी न करता मर्यादित संख्येने भाविकांनी सुरक्षित अंतर आणि मास्क वापरणे यांचे काटेकोर पालन करत दर्शन घ्यावे, असे आवाहन तहसीलदार सौदागर तांदळे अन् नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी केले आहे. श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी भाविकांची संख्या न्यून करण्यात आली असून प्रतिदिन मंदिराच्या परिसरात स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण केले जात आहे; मात्र ‘ऑनलाईन’ पद्धतीने प्रवेश ‘पास’ देणे चालू आहे.
आजपासून श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शन वेळेत पालट ! – महेश जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती
कोल्हापूर, २४ फेब्रुवारी (वार्ता.) – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असणार्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनाच्या वेळेत पालट करण्यात आला आहे. आता २५ फेब्रुवारीपासून सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते रात्री ८ पर्यंतच देवीचे दर्शन घेता येणार आहे. मंदिर परिसरात ‘मास्क’चा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. छायाचित्र घेण्यास, तसेच ‘सेल्फी’ घेण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. महेश जाधव यांनी दिली आहे. श्री. जाधव पुढे म्हणाले की, श्री महालक्ष्मी मंदिर खुले झाल्यानंतर दर्शनाची वेळ सकाळी ६ ते रात्री ८ अशी होती; मात्र वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे २५ फेब्रुवारीपासून ही वेळ पालटण्यात आली आहे. दुपारी १२ ते ३ या वेळेत मंदिर पूर्णत: बंद रहाणार आहे.
नांदेड येथे विदर्भातून येणार्या वाहनांची कसून पडताळणी चालू !
अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्यानंतरच मराठवाड्यात प्रवेश
नांदेड – विदर्भातील अमरावती जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्याने विदर्भातून मराठवाड्यात येणार्या प्रत्येक प्रवाशाची पडताळणी केली जात आहे. मराठवाडा आणि विदर्भ यांच्या सीमेवर माहूरजवळ पडताळणी छावणी लावण्यात आली आहे. कोरोना चाचणी ‘निगेटिव्ह’ आल्यानंतरच लोकांना मराठवाड्यात प्रवेश दिला जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी हे पाऊल उचलले आहे.
१ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य कोरोना प्रतिबंधात्मक लस
नवी देहली – १ मार्चपासून ६० पेक्षा अधिक वय असणारे नागरिक, तसेच इतर व्याधी असणार्या ४५ हून अधिक वय असणार्या नागरिकांचे लसीकरण केले जाणार, अशी घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केली.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर पुढे म्हणाले की, १० सहस्र सरकारी आणि २० सहस्र खासगी केंद्रांवर ही लसीकरण मोहीम पार पडणार आहे. ज्यांना खासगी रुग्णालयातून लसीकरण करून घ्यायचे आहे त्यांना पैसे भरावे लागतील. सरकारी केंद्रांवर ही लस विनामूल्य उपलब्ध असेल.
अमरावती शहरात ४२ ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त, तर अनेक ठिकाणी नाकाबंदी !
अमरावती – जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला अटकाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहर, तसेच जिल्ह्यातील अचलपूर आणि अन्य ९ गावांमध्ये २२ फेब्रुवारीपासून ७ दिवसांची कठोर ‘दळणवळण बंदी’ लागू केली आहे. ‘दळणवळण बंदी’त लोकांनी नियम तोडू नये, यासाठी अमरावती शहरात ४२ ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, तसेच ही ४२ ठिकाणे वगळता अमरावती शहराला जोडणार्या मुख्य काही मार्गांवर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. अत्यावश्यक सेवेला मुभा देण्यात आली आहे; परंतु सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ही अत्यावश्यक सेवा चालू रहाणार आहे.
२३ फेब्रुवारी या दिवशी जिल्ह्यात ९२६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत एका वर्षात एवढे कोरोनाबाधित रुग्ण केव्हाच न निघाल्याने जिल्हा प्रशासनासमोर नवीन आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे ‘मास्क लावा, कोरोना नियमांचे पालन करा’, असेे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे विभागात सध्या ९ सहस्र ३४० कोरोनाचे रुग्ण
पुणे – येथील ५ लाख ८२ सहस्र ६८३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६ लाख ८ सहस्र २८६ झाली आहे. ‘अॅक्टीव’ रुग्ण संख्या ९ सहस्र ३४० इतकी आहे. कोरोनाबाधित एकूण १६ सहस्र २६३ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण २.६७ टक्के एवढे आहे. पुणे विभागामध्ये बर्या होणार्या रुग्णांचे प्रमाण ९५.७९ टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
२ २ फेब्रुवारी या दिवशीच्या बाधित रुग्ण संख्येच्या तुलनेत २३ फेब्रुवारी या दिवशी पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये ८९५ ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात ७०१, सातारा जिल्ह्यात ९५, सोलापूर जिल्ह्यात ६८, सांगली जिल्ह्यात ११, तर कोल्हापूर जिल्ह्यात २० अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे. तसेच बर्या होणार्या रुग्णांमध्ये पुणे ६७१, सातारा २५, सोलापूर ५६, सांगली १३ आणि कोल्हापूर १९ एवढ्या रुग्णांचा समावेश आहे.