बंगालमध्ये बॉम्बच्या आक्रमणात राज्यातील मंत्री झाकीर हुसेन घायाळ !

तृणमूल काँग्रेसचे २२ हून अधिक कार्यकर्ते घायाळ

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सरकारमधील मंत्रीही सुरक्षित नाहीत, यावरून तेथील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती उघड होते ! लोकशाहीत कार्यरत असे सरकार जनतेसाठी लज्जास्पदच होय !

राज्यमंत्री झाकीर हुसेन

मुर्शिदाबाद (बंगाल) – येथे तृणमूल काँग्रेस सरकारमधील राज्यमंत्री झाकीर हुसेन यांच्यावर अज्ञातांनी फेकलेल्या बॉम्बच्या स्फोटात ते गंभीररित्या घायाळ झाले. ही घटना १७ फेब्रवारीला रात्री ९.३०च्या सुमारास येथील निमतिया रेल्वे स्थानकात घडली. या वेळी तृणमूल काँग्रेसचे २२ हून अधिक कार्यकर्तेही घायाळ झाले. यांतील ७ जणांची प्रकृती गंभीर आहे. झाकीर हुसेन यांच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. हुसेन आधी काँग्रेसमध्ये होते, नंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हे आक्रमण भाजपकडून करण्यात आल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपच्या नेत्यावर बॉम्ब आणि गोळीबार करत आक्रमण करण्यात आले होते.

१. हुसेन रेल्वेतून जाण्यासाठी रेल्वेस्थानकावर जात होते. ते फलाट क्रमांक २ च्या दिशेने त्यांच्या कार्यकर्त्यांसह जात असतांना त्यांच्यावर बॉम्ब फेकण्यात आला. पोलीस येथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या चित्रणाद्वारे आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

२. या आक्रमणामागे कोणते कारण आहे, याचाही शोध पोलीस घेत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या सूत्रांच्या सांगण्यानुसार हुसेन यांनी मुर्शिदाबाद येथे पशू तस्करांच्या विरोधात सरकारकडे लेखी तक्रार केली होती. तसेच त्यांचे येथील व्यापार्‍यांशी यावरून वादही झाला होता. यातून हे आक्रमण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हुसेन यांनी स्वतः त्यांच्यावर आक्रमण होण्याविषयी विधान केले हेते.

३. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी या घटनेवर म्हटले, ‘राज्यातील मंत्रीही सुरक्षित नाहीत, हे दुर्दैवी आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अशी असेल, तर सामान्य जनतेची सुरक्षा कशी आहे, हे लक्षात येते.’

(सौजन्य : BTv Bharat)

हुसेन यांच्या हत्येचा प्रयत्न ! – ममता बॅनर्जी

मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी आरोप केला की, हुसेन यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. लोकशाहीमध्ये वाद असू शकतो; मात्र हत्या कशी करू शकतो ?

या आक्रमणाला केंद्र सरकार उत्तरदायी आहे. (मागील काही वर्षांत राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांवर आक्रमण होऊन त्यांत शेकडोंचा बळी गेला आहे. त्याला उत्तरदायी कोण आहे, याचेही उत्तर ममता बॅनर्जी यांनी देणे आवश्यक ! – संपादक)

दुसरीकडे तृणमूल काँग्रेसमधून बडतर्फ करण्यात आलेले मुर्शिदाबाद जिल्हा परिषदेचे सभापती मुशर्रफ हुसेन यांनी दावा केला आहे की, हे आक्रमण पक्षांतर्गत वादाचा परिणाम आहे.